देश
‘गोल्ड’न बॉय!.. तिरंदाजी वर्ल्ड कपमध्ये भारताला सुवर्णपदक
शांघाय येथे सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत शनिवारी भारताच्या पुरुष संघाने ‘गोल्ड’न कामगिरी केली आहे. अभिषेक वर्मा, चिन्ना राजू श्रीधर आणि अमनजीत सिंग या त्रिकुटानं जबरदस्त कामगिरी करत अंतिम लढतीत कोलंबियाच्या संघाला पराभूत केले. चुरशीच्या झालेल्या या लढतीत भारताने कोलंबियाला २२६-२२१ अशा गुणफरकाने नमवले.
तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या पुरुष गटाच्या अंतिम फेरीत भारतीय संघ आणि कोलंबिया संघात चुरस पाहायला मिळाली. सुरुवातीपासूनच दोन्ही संघांनी बहारदार कामगिरी केली. अभिषेक वर्मा, चिन्ना राजू श्रीधर आणि अमनजीत सिंग या त्रिकुटाने अखेरच्या क्षणी जबरदस्त कामगिरी केली. अटीतटीच्या झालेल्या या लढतीत अखेर भारताने विजय मिळवला. कोलंबियाचा २२६-२२६ अशा गुणफरकाने पराभव केला. भारतीय पुरुष संघाने उपांत्यफेरीत अमेरिकेला २३२-२३० अशा गुणफरकाने हरवून अंतिम फेरीत प्रवेश केला होता. दुसरीकडे मिश्र दुहेरीच्या उपांत्यफेरीत अभिषेक वर्मा आणि ज्योती सुरेखा वेन्नम या जोडीचा कोरियाने १५२-१५८ अशा गुणफरकाने पराभव केला होता. आता कांस्यपदकासाठी ही जोडी अमेरिकेशी भिडणार आहे.
दरम्यान, रिओ ऑलिम्पिकनंतर पहिल्यांदाच मोठ्या स्पर्धेत सहभागी झालेल्या अतानु आणि दिपिका यांनी रिकर्व्ह प्रकारात निराशा केली. उपउपांत्य फेरीत अतानुचा नेदरलँडच्या स्टीव्ह विलेयरने पराभव केला. तर दिपिकालाही पराभवाचा सामना करावा लागला. जपानच्या हायाकावा रेनने तिचा १-७ ने पराभव केला. तर रिकर्व्ह मिश्र दुहेरीच्या उपउपांत्यफेरीत अतानु आणि दिपिका जोडीचा रशियाच्या जोडीने ३-५ ने पराभव केला.