देश
रॅन्समवेअरचा धोका कायम, स्मार्टफोनही होऊ शकतो हॅक?
रॅन्समवेअरच्या वॉनाक्राय व्हायरसने जगभरातील सायबर जगतात धुमाकूळ घातलाय. अनेक वेबसाईटस हॅक करणाऱ्या या व्हायरसचा धोका आटोक्यात आल्याचे बोलले जात असले तरीही हा धोका अद्यापही पूर्णपणे टळलेला नसल्याचे दिसते आहे. लॅपटॉप आणि कॉम्प्युटरनंतर हा धोका आता मोबाईललाही असल्याचे सांगितले जात आहे.
भारताला या व्हायरसमुळे तितका फटका बसला नसल्याचे सांगितले जात आहे. मात्र भारतातील सायबर यंत्रणा कितपत धोक्यात आहे याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. सध्या इंटरनेट वापरणाऱ्यांपैकी अनेक जण सर्व व्यवहार स्मार्टफोनच्या माध्यमातून करतात. त्यामुळे स्मार्टफोनमध्ये या व्हायरसने शिरकाव केला तर नेमका कशा प्रकारचा धोका उदभवेल ते सांगता येत नसल्याचे यंत्रणेकडून सांगण्यात आले. मात्र, मोबाईल यंत्रणा हॅक झाल्यास त्याचा मोठा फटका निश्चितच मोबाईल युजर्सना बसेल.
याबाबत कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमचे महासंचालक म्हणाले, हॅकर्स कायमच दोन पाऊले पुढे असतात. त्यामुळे सायबर हल्ल्यांच्या बाबतीत काय घडेल हे कोणीच सांगू शकत नाही. या हल्ल्याचा शेवट कधी होईल याबाबतही काही सांगता येत नाही. मात्र आताच्या हल्ल्याचा महत्त्वाच्या आणि विश्वासार्ह गोष्टींवर परिणाम होणार नाही याची काळजी घेण्यासाठी कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमचे काम चालू आहे.
रॅन्समवेअरच्या माध्यमातून कॉम्प्युटर यंत्रणा हॅक केल्या जात असून, जगभरातील जवळपास १०० देशांना या सायबर हल्ल्याचा फटका बसला आहे. हा हल्ला नेमका कोणी केला यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रयत्न चालू आहेत. नुकताच या सायबर हल्ल्याचा युरोप, अमेरिका आणि आशियातील अनेक बँका, रुग्णालयांना फटका बसला होता. जगभरात हा हल्ला आटोक्यात आल्याचे सांगितले जात होते. मात्र अनेक ठिकाणी हा व्हायरस अजूनही शिरकाव करत असल्याचे दिसते आहे.
‘झोमॅटो’वरुनही आज जगभरातील लाखो लोकांची अकाऊंट हॅक करण्यात आली आहेत. याशिवाय मोबाईलवरही काही क्रमांकांत व्हायरस असून ते क्रमांक ब्लॉक करावेत असे मेसेज गेल्या काही दिवसांपासून फिरत आहेत.