Menu

खेल
भारताची आश्वासक सुरुवात; रोहित-धवनची अर्धशतकी सलामी

nobanner

श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाने आश्वासक सुरुवात केली आहे. रोहित शर्मा आणि शिखर धवनने अर्धशतकी भागिदारी रचत संघाला चांगली सुरुवात करुन दिली आहे. मागील सामन्याप्रमाणेच रोहित आणि शिखर प्रतिस्पर्धी गोलंदाजांचा समाचार घेत आहेत. त्यामुळे या सामन्यातही भारतीय संघ मोठी धावसंख्या रचण्याची शक्यता आहे.
भारत आणि श्रीलंकेचा संघ चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत आमनेसामने उभे ठाकले आहेत. श्रीलंकेने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. पावसाची शक्यता असल्याने श्रीलंकेने भारताला फलंदाजीसाठी पाचारण केले आहे. पहिल्या सामन्यात पाकिस्ताननेदेखील पावसाचा मुद्दा लक्षात घेऊन भारताला प्रथम फलंदाजी दिली होती. मात्र भारताने ३१९ धावांचा पाऊस पाडत पाकिस्तानची धुलाई केली होती. त्यामुळे श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात भारतीय फलंदाज कशी कामगिरी करतात, याकडे लक्ष लागले आहे.
भारत या सामन्यात उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित करण्यासाठी मैदानावर उतरला आहे. तर श्रीलंकेच्या संघाला स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे. श्रीलंकेसाठी ‘करो वा मरो’ अशी स्थिती युवा खेळाडूंचा कस लागणार आहे. पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा दारुण पराभव करणारा भारतीय संघ जबरदस्त फॉर्मात असल्याने श्रीलंकेसमोरील आव्हान अतिशय अवघड आहे.
पाकिस्तानवर १२४ धावांनी दणदणीत विजय मिळवल्यानंतर श्रीलंकेविरुद्ध भारताचे पारडे कमालीचे जड दिसत आहे. श्रीलंकेने सलामीच्या लढतीत दक्षिण आफ्रिकेकडून ९६ धावांनी हार पत्करल्यामुळे त्यांना भारताविरुद्धच्या लढतीसाठी अपयश मागे टाकून आत्मविश्वासाने लढावे लागणार आहे. मात्र भारताच्या विजयी घोडदौडीला लंडनमधील हवामान अडथळा ठरू शकेल. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
दोन्ही संघांची कागदावर जरी तुलना केली तरी भारतीय संघ उजवा असल्याचे सहज स्पष्ट होते. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात क्षेत्ररक्षणातील काही चुका वगळल्यास सर्वच बाबतीत भारतीय संघाने छाप पाडली होती. गतविजेत्या भारताच्या फलंदाजीच्या फळीत दिग्गज फलंदाजांचा समावेश आहे, तर गोलंदाजीचा मारासुद्धा वैविध्यपूर्णतेमुळे समृद्ध आहे.
श्रीलंकेच्या संघाची पुनर्बांधणी चालू असल्यामुळे त्यांचा सांघिक समतोल साधला जात नाही. नियमित कर्णधार अँजेलो मॅथ्यूजचा फॉर्म आणि तंदुरुस्ती ही संघासाठी प्रमुख समस्या आहे. याचप्रमाणे अनुभवी सलामीवीर उपुल थरंगाला दोन सामन्यांसाठी निलंबित केल्यामुळे त्यांच्या चिंतेत भर पडली आहे. श्रीलंकेला आव्हान टिकवण्यासाठी विजय अनिवार्य असल्यामुळे त्यांची मदार प्रामुख्याने कर्णधार मॅथ्यूज आणि मलिंगा यांच्या कामगिरीवर असेल.
भारताविरुद्धच्या लढतीत श्रीलंकेने आक्रमकता दाखवावी, असे आवाहन कुमार संगकाराने केले होते. मात्र हे आव्हान त्यांच्यासाठी सोपे नसेल, अशी कबुलीसुद्धा त्याने दिली होती. २०१५च्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेनंतर महेला जयवर्धने आणि संगकारा या श्रीलंकेच्या भरवशाच्या फलंदाजांनी निवृत्ती पत्करली. त्यानंतर दोन वर्षे उलटली तरी श्रीलंकेच्या क्रिकेटला तारू शकेल, असा फलंदाज त्यांना गवसलेला नाही. दिनेश चंडिमल किंवा चमरा कपुगेद्रा यांनी क्वचितप्रसंगी आपल्या कामगिरीने लक्ष वेधले. मात्र त्यात सातत्याचा अभाव आढळला.
भारताचा ११ जूनला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध साखळीतील अखेरचा सामना होणार आहे. मात्र श्रीलंकेवर आरामात विजय मिळवून तणावमुक्त पद्धतीने अखेरचा सामना खेळण्याची योजना भारताने आखली आहे. पाकिस्तानविरुद्ध रोहित शर्माने झोकात पुनरागमन करताना ९१ धावांची खेळी साकारली. शिखर धवनने सकारात्मक फलंदाजीचे दर्शन घडवले. श्रीलंकेविरुद्ध गेली काही वष्रे दिमाखदार कामगिरी करणाऱ्या कर्णधार विराट कोहलीने पाकिस्तानविरुद्ध नाबाद ८१ धावा केल्या. लसिथ मलिंगा, सुरंगा लकमल आणि न्यूवान प्रदीप यांना त्याने आधीच इशारा दिला आहे. एजबॅस्टनला युवराज सिंगने आक्रमक फलंदाजी करीत वेगाने धावा केल्या.
हार्दिक पंड्याने वादळी फलंदाजी करीत भारताची धावसंख्या वाढवली होती. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या महत्त्वाच्या लढतीआधी महेंद्रसिंग धोनीला थोडी सरावाची संधी देण्याची आवश्यकता आहे. पाकिस्तानविरुद्ध कोहलीने पंड्याला धोनीच्या आधी फलंदाजीला पाचारण केले. भारताचा गोलंदाजीचा मारा समतोल आहे. भुवनेश्वर कुमारकडे चेंडू नियंत्रित स्विंग करण्याची क्षमता आहे. उमेश यादवकडे वेग आहे, तर जसप्रित बुमराहकडे अखेरच्या षटकांमध्ये फलंदाजांना जखडून ठेवण्याचे कौशल्य आहे. या परिस्थितीत मोहम्मद शमी आणि ऑफ-स्पिनर रविचंद्रन अश्विन यांना मात्र अंतिम ११ खेळाडूंमध्ये स्थान मिळणे मुश्कील झाले आहे. श्रीलंकेविरुद्ध अश्विनच्या समावेशाची आशा असली तरी विजयी संघच कायम राखण्याची शक्यता जास्त आहे.
संघ : भारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, युवराज सिंग, महेंद्रसिंग धोनी (यष्टिरक्षक), केदार जाधव, हार्दिक पंडय़ा, रवींद्र जडेजा, जसप्रित बुमराह, उमेश यादव, भुवनेश्वर कुमार.
श्रीलंका : अँजेलो मॅथ्यूज (कर्णधार), निरोशान डिक्वेला (यष्टिरक्षक), दनुष्का गुनाथिलाका, कुशल मेंडिस, दिनेश चंडिमल, कुशल परेरा, असीला गुणरत्ने, थिसारा परेरा, सुरंगा लकमल, लसिथ मलिंगा, न्यूवान प्रदीप.
भारताच्या फलंदाजीला सुरुवात; लागोपाठच्या षटकांमध्ये रोहित शर्मा, शिखर धवनचे चौकार
२ षटकांनंतर भारत बिनबाद १०; शिखर धवन ६, रोहित शर्मा ४ धावांवर नाबाद
४ षटकांनंतर भारत बिनबाद १२
६ षटकांनंतर भारत बिनबाद २७; धवन २०, रोहित ७ धावांवर नाबाद
भारतीय सलामीवीरांची आश्वासक सुरुवात; भारतीय संघाच्या ५० धावा पूर्ण