देश
येऊरमध्ये क्रिकेटचा ‘गोंधळ’
मध्यरात्रीपर्यंत प्रचंड गोंगाटात सामने; प्रेक्षकांकडून फटाक्यांची आतषबाजी
आधीच उपद्रवी पर्यटकांमुळे मूळचे निसर्गसौंदर्य आणि शांतता धोक्यात आलेल्या येऊर परिसरात आता क्रिकेटच्या रूपाने नव्या संकटाची भर पडली आहे. या ठिकाणी खासगी क्रीडासंकुल असून त्यांच्या वतीने क्रिकेटचे सामने भरवण्यात येत आहेत. मध्यरात्रीपर्यंत सुरू असलेल्या या सामन्यांमध्ये प्रेक्षकांचा धुडगूस सुरू असतो. मद्यपान करून गोंधळ घालणे आणि फटाके वाजवून जल्लोष करणे यांमुळे स्थानिक नागरिकांना त्रास होतो, त्याशिवाय वनपरिसराची शांतताही धोक्यात येते. वन विभाग आणि पोलीस यंत्रणेचे याकडे सपशेल दुर्लक्ष झालेले आहे.
निसर्गरम्य येऊर परिसरात बंगले आणि हॉटेलमध्ये येऊन पाटर्य़ा करणाऱ्या पर्यटकांची संख्या नेहमीच जास्त असते. पावसाळा सुरू होताच येऊरचा निसर्ग अनुभवण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत कमालीची वाढ होते. पर्यटकांच्या बेताल वर्तनामुळे येऊरची शांतता भंग होत असल्यामुळे पर्यावरण संस्थांमार्फत याबाबत कायम आवाज उठवला जातो. येऊरच्या जंगलात पर्यटकांचा वाढता हस्तक्षेप रोखण्यासाठी संध्याकाळी सहानंतर गावकऱ्यांच्या वाहनांशिवाय इतरांना प्रवेश देऊ नये, अशी मागणी एका संस्थेतर्फे करण्यात आली होती. मात्र अद्यापही या मागणीला मंजुरी देण्यात आली नाही. अजूनही रात्रीच्या वेळी वाहनांना प्रवेश दिला जात असल्याने पाटर्य़ा, क्रिकेट सामन्यांचा जल्लोष यामुळे येऊरमध्ये प्रचंड गोंगाट वाढलेला आहे.
खासगी संस्थेच्या वतीने भरवण्यात येणाऱ्या सामन्यांमुळे गोंधळ प्रचंड वाढलेला आहे. सामने पाहताना मद्यप्राशन करणे, फटाके फोडणे, मद्यप्राशन करून वाहने चालवणे, वाहनांमध्ये संगीत लावणे, मोठय़ा आवाजात हॉर्न वाजवणे, हुल्लडबाजी करणे यांसारख्या पर्यटकांच्या बेताल वर्तनाला अद्याप आळा बसला नसल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.
रात्री दोन ते तीन वाजेपर्यंत या संकुलात क्रिकेट खेळत मोठय़ा आवाजात जल्लोष केला जात असल्याने आवाजाचा त्रास सहन करावा लागत असल्याचे येऊरमधील नागरिकांकडून सांगण्यात आले.
वन्यप्राण्यांनाही त्रास
येऊरमध्ये मध्यरात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या क्रिकेट सामन्यांचा त्रास स्थानिकांना तर होतोच, मात्र प्रचंड आवाजाचा, फटाक्यांचा त्रास वन्यजीवांनाही होत आहे.आवाजामुळे काही वन्यजीव वस्तीत येण्याचे प्रकार घडले आहेत, असे स्थानिक रहिवाशांनी सांगितले.
चौकीत पोलीसच नाहीत
या क्रीडा संकुलापासून हाकेच्या अंतरावर येऊरची पोलीस चौकी आहे. मात्र पोलीस चौकीत पोलीस अधिकारीच उपलब्ध नसल्याने तक्रार कुणाकडे करायची, असा प्रश्न नागरिकांकडून विचारण्यात येत आहे. पर्यटकांनी ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठीच्या सूचना वनविभागातर्फे देण्यात येत असल्या तरी येऊरच्या प्रवेशद्वारावरच कडक सुरक्षा व्यवस्था वनविभाग आणि पोलीस यंत्रणेकडून दिली जात नसल्याने पर्यटकांकडून जंगल परिसराजवळ गोंगाट केला जातो, असे पर्यावरण संस्थांकडून सांगण्यात येत आहे.
येऊर शांतता क्षेत्रात येत असल्याने पर्यावरण आणि वन्यजीवांना घातक असलेल्या ध्वनिप्रदूषणाविषयी वनविभागाकडून जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार दाखल करता येऊ शकते. येऊरमधील नागरिकांनी त्वरित संपर्क साधल्यास पर्यावरण संवर्धन कायद्याच्या अंतर्गत याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना कळवण्यात येईल. पोलीस यंत्रणा आणि जिल्हाधिकारी यांच्यातर्फे कारवाई केली जाऊ शकते.