देश
क्रिकेटपटूंसाठी बोली लागते, जवानांना गोळी लागते; जवानाची व्यथा
भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तानविरुद्ध पराभूत झाल्यावर जितके दु:ख होते, तितके दु:ख जवान शहीद झाल्यावर होते का, असा रोखठोक सवाल एका जवानाने उपस्थित केला आहे. एका व्हिडीओच्या माध्यमातून भारतीय जवानाने आपली व्यथा मांडली आहे. ‘भारतीय संघ पाकिस्तानविरुद्ध पराभूत झाल्यावर क्रिकेट चाहत्यांकडून टीव्ही फोडले जातात. मात्र जवान शहीद झाल्यावर कोणी टीव्ही फोडतं का?’ असा प्रश्न व्हिडीओतून विचारला आहे.
महिन्याभरापूर्वी झालेल्या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने भारताचा पराभव केला. यावेळी अनेकांनी भारतीय संघाच्या पराभवाबद्दल दु:ख व्यक्त केले होते. त्याच पार्श्वभूमीवर एका भारतीय जवानाने व्हिडीओ चित्रीत केला आहे. हा व्हिडीओ युट्यूबवर प्रसिद्ध करण्यात आला आहे. ‘क्रिकेटमधील एका पराभवाबद्दल जितके दु:ख व्यक्त केले जाते, तितके दु:ख सीमेवर जवान शहीद झाल्यावर व्यक्त करण्यात येते का?,’ असा सवाल जवानाने विचारला आहे. ‘क्रिकेटपटूंना फॉलो करणाऱ्यांची कोट्यवधींच्या घरात आहे. मात्र देशातील कितीजणांना जवानांच्या शहीद होण्यानं दु:ख होतं ?,’ असेदेखील या जवानाने पुढे विचारले आहे.
‘सीमेवर जवान शहीद होत असल्याच्या बातम्या जवळपास दररोज टीव्हीवर देशातले लोक ऐकतात. जेव्हा एक जवान शहीद होतो, तेव्हा त्याच्या पत्नीचा आधार जातो. मुलांचा बाप जातो. आईचा मुलगा जातो. मात्र तेव्हा कोणाला दु:ख होतं का? तेव्हा कोणी टीव्ही फोडतं का?’, असा प्रश्न जवानाने विचारला आहे. ‘आम्ही क्रिकेटचे खूप मोठे फॅन आहोत. क्रिकेटपटूंसाठी आमच्या देशात बोली लागते. मात्र जवानांना गोळी लागते. देशाच्या सीमेचे, देशवासीयांचे रक्षण करताना इतके जवान शहीद होतात. त्यावेळी कोणी रडतं का ?,’ असा सवाल जवानाने उपस्थित केला आहे.
‘देशात क्रिकेटपटूंना फॉलो करणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. मात्र देशाचे खरे हिरो सैन्याचे जवान आहेत. ५०० मीटरच्या मैदानावर कोणी हिरो नसतो. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत देशाच्या सीमेचे रक्षण करणारे जवान देशाचे खरे हिरो आहेत. देशातील जनतेला सुखाने झोपता यावे, म्हणून आम्ही जवान सीमेवर पहारा देतो. आम्ही जागतो म्हणून देश सुखाने झोपू शकतो. त्यामुळे आम्हीच देशाचे खरे हिरो आहोत आणि आम्हीच देशाचे खरे हिरो राहू,’ असे जवानाने व्हिडीओमध्ये म्हटले आहे.