देश
पिंपरीतील वर्तुळाकार मार्गात अर्थकारण
प्रस्तावित मार्गाला विरोध कायम; भाजप एकाकी; विरोधक आक्रमक
पिंपरी-चिंचवड शहरातील जवळपास निम्म्या भागातून जाणारा उच्चक्षमता द्रुतगती हा वर्तुळाकार मार्ग (हाय कपॅसिटी मास्क ट्रान्झिट रूट- एचसीएमटीआर) वादाच्या भोवऱ्यात सापडला असून, या प्रस्तावित मार्गाला होत असलेला विरोध दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. ‘रिंगरोड’वरून पक्षीय राजकारण तापल्याने आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरू झाल्या आहेत. सत्तारूढ भारतीय जनता पक्षाला एकाकी पाडून विरोधक एकत्र आले असून ते आक्रमक झाले आहेत. ‘वोट बँक’साठी अतिक्रमणांचे समर्थन करण्याची वेळ राजकीय पक्षांवर आली आहे. प्रस्तावित मार्गावर बडय़ा असामींच्या तसेच पुढाऱ्यांच्या जमिनी असल्याचा संशय व्यक्त होऊ लागल्याने या मधील ‘अर्थकारण’ही पुढे आले आहे.
जवळपास ७०० कोटी रुपये खर्च अपेक्षित असलेला हा पिंपरी-चिंचवड शहरातील ३० किलोमीटरचा वर्तुळाकार मार्ग आहे. कासारवाडी (नाशिकफाटा उड्डाणपूल), नेहरूनगर, एमआयडीसी, स्पाईन रस्ता, भक्ती-शक्ती, रावेत, वाल्हेकरवाडी, काळेवाडी फाटा, रहाटणी, िपपळे सौदागर, पिंपळे गुरव व कासारवाडी असा नियोजित मार्ग आहे. वाहतुकीचा ताण कमी करण्याचा हेतू ठेवून १९९७च्या विकास आराखडय़ानुसार असलेला हा प्रस्तावित मार्ग महापालिका व प्राधिकरणाच्या वतीने संयुक्तपणे विकसित करण्यात येणार आहे. मात्र, २० वर्षांपासून प्रत्यक्ष कार्यवाही झाली नाही. त्यामुळे बहुतांश ठिकाणी अतिक्रमणे झाली आहेत. ती काढून जागा ताब्यात घेणे अवघड जागचे दुखणे झाले आहे. रहाटणीत हॉटेल ‘फाउंटन’वर कारवाई करून अतिक्रमणे काढण्याची मोहीम सुरू झाली, तेव्हापासून नागरिकांमध्ये घबराट आहे. पालिकेने दोन दिवसांची मोहीम राबवून काही अतिक्रमणे काढली तर प्राधिकरणाने त्यादृष्टीने नोटिसा बजावल्या. या कारवाईस रहिवाशांचा तीव्र विरोध आहे. या संदर्भात, निवेदने, बैठका, मेळावे, आंदोलने, मोर्चे सुरू असून रहिवासी आक्रमक आहेत. घरे पाडू नका, कालबाहय़ झालेला रिंगरोड प्रकल्प रद्द करा, अशी त्यांची मुख्य मागणी आहे. संभाव्य ‘पाडापाडी’वरून वातावरण तापले आहे. राजकारणातील हिशेब चुकते करण्याच्या हेतूने आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत.