देश
मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेसाठी भाविकांची रांग सहा तासांसाठी थांबवली, वारकऱ्यांमध्ये रोष
पांडुरंगाच्या दर्शनाची आस घेऊन वारकरी पंढरपुरात दाखल झाले आहेत. परंतु, विठ्ठल मंदिर समिती प्रशासनाने मंदिरात अचानक दुरूस्तीचे काम हाती घेतल्याने विठ्ठल दर्शनाची रांग सहा तासांपर्यंत थांबली होती. रविवारी रात्री या प्रकारामुळे मनःस्ताप झालेल्या भाविकांनी एकत्र येऊन मंदिर प्रशासनाच्या त्रासदायक नियोजनाबद्दल संताप व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेसाठी अचानक सुरू केलेल्या कामामुळे भाविकांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागला.
आषाढी यात्रेनिमित्त विठ्ठलाचे दर्शन चोवीस तास सुरू असले तरी दर्शन रांग रविवारी रात्रीपासून दूर गोपाळपूरच्या पुढे अभियांत्रिकी महाविद्यालयापर्यंत गेली आहे. दर्शन रांगेत लाखांपेक्षा अधिक भाविक आहेत. मुळातच मंदिरात दर मिनिटाला केवळ ३० ते ३५ भाविकांनाच विठ्ठल दर्शन घडत असल्यामुळे दर्शन रांग पुढे सरकण्यास विलंब होत आहे. दर्शन रांग वाढतच चालली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अन्य १० मंत्र्यांसह आषाढी एकादशीला विठ्ठलाच्या शासकीय महापुजेसाठी पंढरपुरात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर शेतकरी संपूर्ण कर्जमाफीच्या प्रश्नावर काही शेतकरी संघटनांनी पंढरीत मुख्यमंत्र्यांना विठ्ठलाच्या महापुजेपासून रोखण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे लाखो भाविकांच्या गर्दीत पंढरपूर यात्रेत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये म्हणून पोलीस खबरदारी घेत आहेत. शेतकरी, आंदोलक मुख्यमंत्री फडणवीस यांच्यापर्यंत कोणत्याही परिस्थितीत पोहोचू नये यासाठी प्रशासनाने मंदिराजवळ लोखंडी साहित्य आणून वेल्डिंगचे काम हाती घेतले होते. या दुरूस्ती कामामुळे दर्शन रांगेवर मोठा परिणाम होऊन दर्शन रांग सहा तासांपर्यंत लांबली.
परिणामी दर्शन रांगेतील भाविक अक्षरशः वैतागले होते. दर्शन रांग तब्बल सहा तासांपर्यंत एकाच ठिकाणी थांबल्यामुळे त्रस्त भाविकांच्या सहनशक्तीला बांध फुटला. यातच दर्शन रांगेत सुविधांचा अभाव असल्यामुळे भाविक तीव्र संताप व्यक्त करीत होते. बरेच भाविक दहा ते पंधरा तास दर्शन रांगेत असल्यामुळे त्यांच्या खाण्या-पिण्याचीही मोठी अडचण निर्माण झाली होती. पत्रा शेड मधील भाविक वैतागले आहेत.
अंत पाहू नका, वारकऱ्यांचा अधिकाऱ्यांसमाेर संताप
या त्रस्त भाविकांनी मध्यरात्रीनंतर दर्शन रांगेतील पत्राशेडची जबाबदारी असलेल्या तहसीलदार संजय पाटील यांच्या समोर एकत्र येऊन संतापाच्या भावनेला वाट मोकळी करून दिली. आम्ही विठ्ठलाच्या दर्शनाची आस घेऊन शेकडो मैलावरून पायपीट करत आलो आहोत. आम्हाला विठ्ठल दर्शन हवे आहे. मुख्यमंत्र्यांशी आम्हाला काही देणेघेणे नाही. आमचा अंत पाहू नका. सहा तासांपर्यंत ताटकळत दर्शन रांगेत एकाच ठिकाणी उभे असताना एक तर पोलीस दर्शन रांगेतून बाहेर सोडत नाहीत. आणि सोडलेच तर पुन्हा दर्शन रांगेत घेत नाहीत. नैसर्गिक विधीसाठीदेखील अडचण होत असल्याबद्दल भाविक तहसीलदारांना खडसावत होते. दरम्यान. आयपीएस अधिकारी निखिल पिंगळे यांनी पत्रा शेडला भेट देऊन भाविकांच्या भावना व अडचणी जाणून घेतल्या.