देश
विदर्भात मुसळधार पाऊस; गडचिरोलीतील १५० गावांचा संपर्क तुटला
पावसाळ्याला सुरुवात होऊन महिना उलटला. मध्यंतरी पावसाने दडी मारल्याने शेतकरी वर्गाची चिंता वाढली असताना पावसाने पुन्हा एकदा दमदार सुरुवात केली आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणासह विदर्भालाही पावसाने झोडपून काढले. हा पाऊस विदर्भात थैमान घालणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला असून, गेल्या दोन दिवसांपेक्षा पावसाचा जोर अधिक वाढणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यातील भामरगड येथे पाऊस सुरुच असून या भागातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील ८ तालुक्यांत अतिवृष्टी झाली असून, गेल्या २४ तासांत याठिकाणी १२१.४ मिमी इतका पाऊस झाला. या पावसामुळे तब्बल १५० गावांचा संपर्क तुटला असून, ठिकठिकाणी वीजसेवादेखील खंडीत झाली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून नागरिकांनी सतर्क रहावे, असा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात सार्वत्रिक पावसाने हजेरी लावली असून काही ठिकाणी मुसळधार पावसाचा सामना नागरिकांना करावा लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.