देश
स्मारकाच्या वादामुळे कोपर्डीतील बंदोबस्तात वाढ
कोपर्डी येथे काल, गुरुवारी विविध संघटनांनी मुलीचे स्मारक उभारण्यास विरोध केलेला असतानाही रात्री साडेअकराच्या सुमाराला स्मारकाच्या चौथऱ्यावर मुलीचा पुतळा उभारण्यात आला. मात्र तणाव निर्माण झाल्याने मुलीच्या नातेवाइकांनी तो पुतळा कापडाने झाकून टाकला. तणावामुळे पुतळय़ाच्या संरक्षणासाठी व गावातही पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
कोपर्डीतील अत्याचाराच्या घटनेला काल वर्ष झाले. या निमित्ताने राज्यभरातून आलेल्यांनी श्रद्धांजली वाहिली व पीडित कुटुंबीयांना आधार दिला. मुलीचे स्मारक बांधण्यासाठी भय्यूजी महाराज यांनी पुढाकार घेतला. स्मारकाचे बांधकाम पूर्ण करून काल त्याचे अनावरण केले जाणार होते, मात्र स्मारक पराक्रमाचे असावे अपमानाचे नाही, अशी भूमिका घेत संभाजी ब्रिगेडसह विविध संघटनांनी त्यास विरोध केला. याच कारणातून कर्जत येथे भय्यूजी महाराजांच्या प्रतीकात्मक पुतळय़ाचे दहन करण्यात आले. वाद झाल्याने भय्यूजी महाराज कोपर्डीत आले नाहीत.
पुतळा भय्यूजी महाराजांचे शिष्य कृष्णा शेळके व पोलीस पाटील समीर जगताप (दोघेही रा. कर्जत) आणि दादा पाटील (बुलढाणा) यांनी बसवल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे. या संदर्भात विचारणा केली असता, मुलीच्या नातेवाइकांनी सांगितले, की हे स्मारक नाही, आमची मुलगी आहे. तिची आठवण म्हणून आम्ही समाधी बांधली आहे व त्यावर आम्ही पुतळा बसवला आहे. यामध्ये कोणाचा काहीही संबंध नाही. भविष्यात आम्ही येथे आमच्या मुलीचे मंदिरही बांधणार आहोत. आम्हाला सर्वानी खूप आधार दिला,
कोणाची भावना दुखवावी असा आमचा हेतू नाही, कोणी गैरसमज करू नये. लेकराच्या आठवणीसाठी ती आमच्या डोळय़ांसमोर राहावी यासाठी ही समाधी आम्हीच बांधली आहे. एकजूट कायम ठेवावी, त्या नराधमांना फाशी व्हावी, यासाठी सर्वानी पुढाकार घ्यावा, अशी आमची विनंती आहे.
कोपर्डी येथे मुलीच्या समाधीवर तिच्या नातेवाइकांनी रात्री पुतळा बसवला, मात्र तो त्यांनी झाकून ठेवला आहे. त्या समाधीस पोलीस संरक्षण दिले आहे. मात्र मुलीच्या कुटुंबीयांची भावना असल्याने त्याचा विचार सर्वानी करावा व कोणी तणाव वाढेल असे कृत्य करू नये. कायदा हातामध्ये घेतल्यास कारवाई करू.
– सुदर्शन मुंडे, पोलीस उपअधीक्षक
****
कोपर्डी येथे आमच्या बहिणीचे स्मारक उभे करू नये, कारण स्मारक पराक्रम, शौर्याचे प्रतीक असते. भविष्यात यामुळे तेढ निर्माण होईल. या स्मारकाला विविध संघटना व सकल मराठा समाजाचा विरोध आहे. पुतळा बसवलेली जागा घरापासून दूर आहे. भविष्यात विटंबना झाल्यास राज्यात पडसाद उमटतील.
-राजेश परकाळे, जिल्हाध्यक्ष संभाजी बिग्रेड
****
समाधी की स्मारक याचा वाद केवळ राजकारण आणि श्रेयासाठी आहे, मात्र त्या मुलीच्या कुटुंबाचा विचार काय आहे, याचा विचार कोणी करण्यास तयार नाही व भय्यूजी महाराजही आपलेच आहेत. त्यांनी कोपर्डीच्या मुलींसाठी दोन व्हॅन दिल्या आहेत. त्या वर्षभर सुरू आहेत, शिवाय कोपर्डीसाठी त्यांनी विकासाचे मॉडेल तयार केले आहे, याचाही विचार करावा. कोपर्डीचे ग्रामस्थ व मुलीचे कुटुंबीयांचा विचार सर्वानी करावा.