Menu

देश
अदानी समूहाकडून १५०० कोटींची करचोरी, ब्रिटिश वृत्तपत्राचा दावा

nobanner

देशात विविध उद्योगक्षेत्रात अग्रेसर असलेल्या अदानी समूहावर करचोरीचा आरोप करण्यात आला आहे. ब्रिटिश वृत्तपत्र ‘द गार्डियन’ला मिळालेल्या दस्तऐवजानुसार, अदानी समूहाने बनावट देयके बनवून सुमारे १५०० कोटी रूपये ‘टॅक्स हेवन’ असलेल्या देशात पाठवल्याचे महसूल गुप्तवार्ता संचालनालयाला (डीआरआय) आढळून आले आहे. ‘गार्डियन’कडे उपलब्ध असलेल्या डीआरआयच्या दस्तऐवजानुसार, अदानी समूहाने शून्य किंवा त्यापेक्षा कमी कर असलेल्या सामानांची निर्यात केली आणि त्याची किंमत वास्तविक मूल्यापेक्षा अनेकपटींनी वाढवून त्यावर बँकांकडून कर्ज घेऊन ते पैसे विदेशात पाठवल्याचे म्हटले आहे.
या दस्तऐवजानुसार, अदानी समूहाने दुबईतील एका बनावट कंपनीच्या माध्यमातून अब्जावधींचे साहित्य महाराष्ट्रातील एका विद्युत प्रकल्पासाठी मागवले आणि नंतर कंपनीने तेच साहित्य अदानी समूहाला वाढीव किंमतीला विकले. अदानी समूहाने या सामानाची किंमत चौपट दाखवली आहे. डीआरआयने हा अहवाल २०१४ साली तयार केला होता. गार्डियनच्या वृत्तानुसार, डीआरआयचा ९७ पानांचा हा अहवाल ‘स्क्राइब डॉट कॉम’वर उपलब्ध आहे. एक्स्प्रेस समूहाच्या ‘जनसत्ता डॉट कॉम’ने डीआरआयचा हा दस्ताऐवज व गार्डियनच्या अहवालाची पडताळणी केलेली नाही.
या अहवालानुसार अदानी समूहाने दक्षिण कोरिया आणि दुबईतील कंपनीच्या माध्यमातून मॉरिशअस येथील एका ट्रस्टला हा पैसा पोहोचवला. या ट्रस्टवर अदानी समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौतम अदानींचे मोठे भाऊ विनोद अदानी यांचे नियंत्रण आहे.

अदानी समूहाने विदेशात पाठवलेला पैशातील मोठा हिस्सा हा भारतीय स्टेट बँक आणि आयसीआयसीआय बँकेकडून कर्जरूपात घेतले होते. डीआरआयने दोन्ही बँकांवर कोणत्याही बेकायदा व्यवहाराचा आरोप केलेला नाही.
दरम्यान, अदानी समूहाने गार्डियनला पाठवलेल्या एका निवेदनात हे सर्व आरोप फेटाळले आहेत. डीआरआयकडून सुरू असलेल्या चौकशीबाबत कंपनीला माहिती असून तपासात सहकार्य केले जात असल्याचे समूहाने म्हटले आहे.
अदानी समूहाविरोधात विद्युत प्रकल्पाच्या योजनेसाठी आयात केलेल्या सामानांची किंमत वाढवल्याचे वृत्त ‘इपीडब्ल्यू पत्रिका’ने १४ मे २०१६ च्या अंकात परंजय गुहा ठाकूरता यांनी दिले होते. नुकताच अदानी समूहाने ‘इपीडब्ल्यू’च्या दोन वृत्तांविरोधात कायदेशीर नोटीस पाठवल्यानंतर परंजय गुहा ठाकूरता चर्चेत आले होते. जर हे वृत्त हटवण्यात आले नाही तर त्यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल करण्यात येईल, असा इशारा अदानी समूहाने दिला होता. ही नोटीस मिळाल्यानंतर ते वृत्त हटवण्यात आले होते आणि ठाकूरता यांनी ‘इपीडब्ल्यू’च्या संपादकपदाचा राजीनामा दिला होता.