Menu

देश
इंदिरा गांधींचे वारसदार राजीव नाहीतच..

nobanner

सीआयएचे भाकीत उघड
तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या होण्याच्या दोन वर्षे अगोदर त्यांच्या मृत्यूनंतरच्या परिस्थितीची चर्चा सीआयएने केली होती व त्यात राजीव गांधी हे त्यांचे वारसदार ठरणार नाहीत कारण राजकीयदृष्टय़ा ते अपरिपक्व आहेत, असे मत व्यक्त करण्यात आले होते. सीआयए या अमेरिकी गुप्तचर संस्थेच्या अलिकडे उघड करण्यात आलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. राजीव गांधी यांना पक्ष व लोकांमध्ये चैतन्य निर्माण करण्यात अपयश आले होते, असे त्या वेळच्या चर्चेत म्हटले होते.
सीआयएच्या १४ जानेवारी १९८३ रोजीच्या अहवालात असे म्हटले आहे, की इंदिरा गांधी यांच्यानंतर काँग्रेस पक्ष कमकुवत होईल. पण १९८४ मध्ये इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर जी परिस्थिती निर्माण झाली ती या अहवालात व्यक्त केलेल्या मतापेक्षा पूर्ण वेगळी होती. राजीव गांधी हे इंदिरा गांधी यांचे वारसदार झाले. नंतर काही महिन्यातच ते प्रचंड जनादेशाने निवडून आले. ‘इंडिया इन दी मिड १९८० – गोल्स अँड चॅलेंजेस’ या अहवालात १९८५ मध्ये इंदिरा गांधी निवडून आल्या असत्या तर काय झाले असते व इतर शक्यतांचाही विचार करण्यात आला होता. इंदिरा गांधी यांचा अचानक मृत्यू झाला, तर राष्ट्रपती झैलसिंग यांच्या निकट असलेले राजीव गांधी हे वारसदार निवडण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडतील, ते स्वत: वारसदार होण्याची शक्यता अनिश्चित आहे. ते राजकीय दृष्टिकोनातून अपरिपक्व असून अनेकांपेक्षा कनिष्ठ आहेत.

इंदिरा गांधी जितका अधिक काळ सत्तेवर राहतील, तितके राजीव यांचे भवितव्य चांगले असेल पण जरी ते पंतप्रधान झाले, तरी त्यांची पकड फार असणार नाही पण जर त्यांनी त्यांच्या आईसारखे डावपेचात्मक काम करून पक्षबांधणी केली, तर त्यांचे स्थान बळकट होईल. इंदिरा गांधी यांचे वारसदार म्हणून संरक्षणमंत्री आर. व्यंकटरामन, परराष्ट्रमंत्री पी. व्ही. नरसिंहराव, अर्थमंत्री प्रणब मुखर्जी, उद्योगमंत्री नारायण दत्त तिवारी यांचा विचार होऊ शकतो, असे त्या वेळच्या परिस्थितीबाबत सीआयएने म्हटले होते.