Menu

देश
स्वावलंबनासाठी ‘विशेष’ मुलांना मदतीचा हात हवा!

nobanner

समाजातील मतिमंद मुलांच्या विकासासाठी गेली सुमारे तीन दशके झटणाऱ्या ‘आविष्कार’ या रत्नागिरीतील संस्थेमध्ये व्यवसायाभिमुख प्रशिक्षण दिले जात असून, या मुलांना आर्थिकदृष्टय़ा स्वावलंबी बनवण्यासाठी उत्पादन केंद्र सुरू करण्यासाठी अर्थसाहाय्याची गरज आहे.
हातखंबा-रत्नागिरी रस्त्यावर मिरजोळे ‘एमआयडीसी’मध्ये असलेल्या या संस्थेमध्ये विविध वयोगटांची शंभराहून जास्त मतिमंद मुले सध्या शिक्षण घेत आहेत. बालवयात नैसर्गिक विधी स्वावलंबीपणाने करायला शिकवण्यापासून स्वयंरोजगारापर्यंत या मुलांची प्रगती घडवण्याचं प्रचंड आव्हान हे शिक्षक यशस्वीपणे पेलत आहेत. आत्तापर्यंत इथून सुमारे ८०० मुले बाहेर पडली आहेत. १८ वर्षांवरील मुलांना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन त्यांचं समाजात पुनर्वसन करण्यासाठी श्यामराव भिडे कार्यशाळेमध्ये स्टेशनरी, कागदी व कापडी पिशव्या, भेटकार्ड, मेणबत्त्या बनवणे, घरकाम, सुतारकाम, शिवणकाम, बागकाम इत्यादींचे प्रशिक्षण दिले जाते. दोनशेपेक्षा जास्त मुलांना या प्रकारे प्रशिक्षित करण्यात आले असून, त्यापैकी सुमारे ४० जण स्वत:चे व्यवसाय सुरू करून स्वावलंबी झाले आहेत. तसेच इथे तयार होणाऱ्या वस्तूंच्या विक्रीचे खास स्टॉल वर्षांतील निरनिराळ्या सणांच्या काळात लावले जातात. पण, तेवढे पुरेसे नाही.
या मुलांसह समाजातील सर्वसामान्य होतकरू तरुणांना बरोबर घेऊन स्वतंत्र उत्पादन केंद्र सुरू करण्याची योजना आहे. तसे झाल्यास उत्पादनक्षमता व एकूण उलाढाल वेगाने वाढू शकेल आणि पूर्णत: व्यावसायिक पद्धतीने हा उपक्रम यशस्वी होऊ शकेल, असा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना विश्वास आहे.

संस्थेला ५० विद्यार्थ्यांसाठीच शासकीय अनुदान मंजूर असून, उर्वरित आणखी सुमारे ५० मुलांसाठी नियुक्त शिक्षक, कर्मचारी, आवश्यक साहित्य इत्यादी सर्व प्रकारच्या खर्चाचा भार संस्था सहन करत आहे. याव्यतिरिक्त आणखी प्रतीक्षा यादीही आहे. समाजातील अशा प्रकारच्या गरजू मुलांची ही संख्या लक्षात घेऊन केवळ सामाजिक बांधिलकीपोटी हा ताण सहन केला जात आहे. समाजातील दानशूर व्यक्ती किंवा संस्थांनी त्यासाठी मदतीचा हात पुढे केल्यास हे आव्हान पेलणे शक्य होईल, असा संस्थेच्या कार्यकर्त्यांना विश्वास आहे.