Menu

देश
आयकर विभागाने छापे मारले; कांद्याचे दर ३५ टक्क्यांनी घसरले

nobanner

नाशिकमधील कांदा व्यापाऱ्यांची घरे आणि गोदामांवर गुरुवारी सकाळी आयकर विभागाने छापे मारल्यानंतर घाऊक बाजारात कांद्याचे दर तब्बल ३५ टक्क्यांनी घसरले. आयकर विभागाने नाशिक जिल्ह्यातील सात व्यापाऱ्यांची घरे, कार्यालये आणि गोदामांवर छापे मारले होते. या छापेमारीमुळे घाऊक बाजारातील कांद्याचे दर घसरले.
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील घाऊक बाजारात कांद्याचे दर ३५ टक्क्यांनी घसरले. बुधवारी कांद्याचा भाव प्रतिक्विंटल १४०० रुपये होता. तो दुसऱ्या दिवशी सरासरी ९०० रुपयांपर्यंत पोहोचला. कांद्याला प्रतिक्विंटलला किमान ५०० रुपये तर कमाल १३३१ रुपये भाव मिळाला. नाशिकमधील सात कांदा व्यापाऱ्यांच्या घरांवर आयकर विभागाने छापे मारले. त्यांची घरे, कार्यालये आणि गोदामांची झाडाझडती घेतली. आयकर विभागाच्या या कारवाईमुळे कांदा व्यापार बाजारात एकच खळबळ उडाली. त्याचा परिणाम कांद्याच्या दरावर झाला. घाऊक बाजारात कांद्याचे दर घसरले, अशी माहिती लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील सूत्रांनी दिली. घाऊक बाजारातील कांद्याचे दर घसरल्याने शेतकऱ्यांनी कमी किंमतीत उत्पादित माल विकण्यास नकार दिला. त्यामुळे लिलाव बंद पडला.
दरम्यान, कांद्याचा साठा करून पैसे कमावल्याच्या संशयावरून आयकर विभागाने नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांवर छापे मारल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. पिंपळगाव, लासलगाव, सटाणा, कळवण, उमराणा, येवला, चांदवड येथील कांदा व्यापाऱ्यांवर आयकर विभागाने ही कारवाई केली. त्यांची कार्यालये आणि गोदामांची झाडाझडती घेण्यात आली. महिनाभरातील कांद्याच्या खरेदी-विक्री व्यवहारांची चौकशी करण्यात येत आहे. व्यापाऱ्यांच्या कार्यालयांतील महत्त्वाची कागदपत्रे अधिकाऱ्यांनी जप्त केली आहेत. तसेच कांदा साठवणुकीची माहितीही घेतली जात आहे.