देश
भविष्यातील फायद्यासाठी त्रास सहन करावाच लागेल, अर्थव्यवस्थेवर उपराष्ट्रपती नायडूंचे मत
अर्थव्यवस्थेवरून विरोधकांबरोबर स्वपक्षीयांच्याही रोषाला सामोरे जावं लागत असलेल्या मोदी सरकारला उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. भविष्यातील फायद्यासाठी तात्पुरता त्रास सहन करावाच लागेल, असे मत नायडू यांनी व्यक्त केली.
नायडूंनी या वेळी माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनाही अप्रत्यक्षरित्या टोला लगावला. काही लोक आपल्या कौशल्याचा वापर करून यावर वाद निर्माण करत आहेत. पण ते हे विसरत आहेत की, त्यांनी काय केलं, काय करायचं आहे आणि काय करण्याची आवश्यकता आहे. हे बोलताना त्यांनी कुणाचं नाव घेतलं नाही. पण त्यांचा अंगुलीनिर्देश हा यशवंत सिन्हा यांच्याकडे होता.
देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनाचा दर (जीडीपी) सातत्याने घसरत आहे. त्यामुळे आर्थिक मंदीसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. जीडीपीच्या घसरणीत नोटाबंदीचा घेतलेला निर्णय हा आगीत तेल ओतण्यासारखाच आहे, असा हल्लाबोल यशवंत सिन्हा यांनी मोदी सरकारवर केला होता. अर्थमंत्र्यांनी अर्थव्यवस्थेला ‘चौपट’ करण्याचे काम केले आहे. यावर मी गप्प बसलो तर राष्ट्रीय कर्तव्य निभावण्यात मी अपयशी ठरेल. त्यामुळे आता मला बोलावेच लागेल, असे म्हणत त्यांनी जेटलींवरच थेट तोफ डागली होती.