Menu

दुनिया
भारतीय लष्करप्रमुख म्हणजे वाचाळवीर; चिनी वृत्तपत्राची टीका

nobanner

भारतीय लष्कर प्रमुख बिपिन रावत यांच्या दोन आघाड्यांवरील युद्धाच्या विधानामुळे चीन संतप्त झाला आहे. भारताचे लष्करप्रमुख वाचाळवीर असल्याची टीका चीनमधील कम्युनिस्ट पक्षाचे वर्तमानपत्र असलेल्या ‘ग्लोबल टाईम्स’ने केली आहे. रावत यांच्या विधानामुळे भारत आणि चीनमधील तणाव वाढेल, असा इशारा ग्लोबल टाईम्सने दिला आहे. भारतीय लष्कर प्रमुखांनी वापरलेली भाषा आगलावी असल्याचेही चिनी वर्तमानपत्राने म्हटले.
‘भारतीय लष्कर प्रमुख बिपिन रावत अतिशय वाचाळ आहेत. त्यांच्या विधानांमुळे बीजिंग आणि नवी दिल्लीचे संबंध बिघडू शकतात. भारतीय लष्करातील मग्रुरीचे दर्शन रावत यांच्या विधानातून घडले आहे. त्यांनी दोन आघाड्यांवर लढण्याची भाषा केली. यासाठीचा आत्मविश्वास भारतीय लष्करात येतो कुठून?,’ असा सवाल ‘ग्लोबल टाईम्स’ने विचारला आहे. याआधी चीन सरकारकडून रावत यांच्या विधानावर टीका करण्यात आली होती.
भारताला पश्चिम आणि उत्तरेकडून धोका असल्याने दोन्ही आघाड्यांवर युद्धासाठी सज्ज राहण्याची आवश्यकता असल्याचे विधान बिपिन रावत यांनी दोन दिवसांपूर्वी केले होते. रावत यांचे हे विधान दोन देशांमधील शत्रुत्वाची भावना वाढवणारे आहे, अशी टीका ‘ग्लोबल टाईम्स’ने केली आहे. याआधी चीन सरकारनेही रावत यांच्या विधानावर तोंडसुख घेतले होते. ‘ब्रिक्स परिषदेदरम्यान भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी सहकार्याची भावना व्यक्त केली. रावत यांचे हे विधान मात्र या भावनेच्या अगदी उलट आहे,’ अशी प्रतिक्रिया चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली होती.

‘दोन्ही देशांना एकमेकांकडून धोका नसल्याचे संकेत दोन दिवसांपूर्वीच अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याकडून देण्यात आले होते. दोन्ही देश एकमेकांसाठी विकासाचे पर्याय आहेत, असेही जिनपिंग यांनी म्हटले होते,’ अशा शब्दांमध्ये चिनी सरकारचे प्रवक्ते जेंग शुआंग यांनी रावत यांच्या विधानावर भाष्य केले. ‘रावत यांचे विधान भारत सरकारची अधिकृत भूमिका आहे का, याची आम्हाला कल्पना नाही. मात्र रावत यांच्या विधानामुळे भारताची भूमिका स्पष्ट झाली आहे,’ असे देखील त्यांनी म्हटले.