Menu

देश
इंग्लंडच्या विजयात ब्रेव‘स्टार’ चमकला

nobanner

अमेरिकेचा ४-१ असा धुव्वा उडवून उपांत्य फेरीत स्थान
रियान ब्रेवस्टरच्या हॅट्ट्रिकच्या जोरावर इंग्लंडने युवा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील विजयी घोडदौड कायम राखताना उपांत्य फेरीत प्रवेश केला. गोवा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर शनिवारी झालेल्या लढतीत इंग्लंडने ४-१ अशा फरकाने अमेरिकेचा धुव्वा उडवला. इंग्लंडने पहिल्यांदाच उपांत्य फेरीत प्रवेश केला असून यापूर्वी त्यांना २००७ आणि २०११मध्ये उपांत्यपूर्व फेरीत गाशा गुंडाळावा लागला होता. उपांत्य फेरीत त्यांच्यासमोर ब्राझील आणि जर्मनी यांच्यातील विजेत्याचे आव्हान असणार आहे.
अमेरिकेच्या बचावफळीतील त्रुटींचा पुरेपूर फायदा उचलताना पहिल्या १५ मिनिटांतच दोन गोल करून इंग्लंडने सामन्यावर पकड घेतली. त्यानंतर संपूर्ण लढतीत त्यांचेच वर्चस्व दिसले. ब्रेवस्टरने (११ व १४ मि.) सुरुवातीचे दोन्ही गोल केले.
मध्यंतरानंतर अमेरिकेकडून अधिक आक्रमक खेळ झाला आणि ७२व्या मिनिटाला त्यांच्या वाटय़ाला यश आले. कर्णधार जोश सरजटने गोल करून अमेरिकेचे खाते उघडले. तत्पूर्वी, ६४व्या मिनिटाला गिब्स व्हाइटने गोल करत इंग्लंडची आघाडी ३-० अशी मजबूत केली होती. भरपाई वेळेने ब्रेवस्टरने पेनल्टी स्पॉट किकवर हॅट्ट्रिक पूर्ण करताना इंग्लंडच्या विजयावर ४-१ अशी शिक्कामोर्तब केली.

इंग्लंड अमेरिका
४ १
रियान ब्रेवस्टर ११’, १४’, ९०’+६ जोश सरजट ७२’
मॉर्गन गिब्स व्हाइट ६४’
घानाची वाटचाल संपुष्टात ; गतउपविजेत्या मालीकडून २-१ असा पराभव
गुवाहाटी : एका तपानंतर जेतेपदाचा दुष्काळ संपवण्याच्या दिशेने कूच करणाऱ्या माजी विजेत्या घानाचा युवा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील प्रवास उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आला. गतउपविजेत्या मालीने २-१ अशा फरकाने विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्यांच्यासमोर स्पेन आणि इराण यांच्यातील विजेत्याचे आव्हान असणार आहे.
पावसामुळे स्टेडियमवरील प्रत्यक्ष प्रेक्षकसंख्या घटलेली पाहायला मिळाली. १५व्या मिनिटाला हॅडजी ड्रॅमीने उजव्या बाजूने सहा यार्डावरून टोलावलेला चेंडू रोखण्यात घानाच्या गोलरक्षकाला अपयश आले आणि मालीने १-० अशी आघाडी घेतली. पहिल्या सत्रातील अखेरच्या काही सेकंदांत घानाच्या इब्राहिम सुलीने गोल केला आणि मैदानावर बरोबरीचा जल्लोष सुरू झाला. मात्र, पंचांनी ऑफ साइडचा इशारा केला आणि घानाचे खेळाडू निराश झाले.
मध्यंतरानंतर खेळ अधिक रोमहर्षक झाला. दोन्ही संघांनी आक्रमणाची धार तीव्र करताना बचावफळीची कसोटी पाहिली. मात्र यात माली सरस ठरला. ६१व्या मिनिटाला डेमॉसा ट्रॅओरेने मालीच्या गोलखात्यात भर घातली आणि सामना २-० असा आपल्या बाजूने अधिक झुकवला. ७०व्या मिनिटाला कुडूस मोहम्मदने पेनल्टी स्पॉट किकवर गोल करून घानाला आशेचा किरण दाखवला. मात्र त्यांच्या वाटय़ाला अपयश आले.

माली घाना
२ १
हॅडजी ड्रॅमी १५’ कुडूस मोहम्मद ७०’
डेमॉसा ट्रॅओरे ६१’