Menu

देश
कोपर्डीत प्रचंड बंदोबस्त

nobanner

एका वेदनेच्या प्रवासाला कोपर्डी (ता. कर्जत) येथून प्रारंभ झाल्यानंतर त्याचे आक्रोशात रूपांतर झाले, आंदोलनाने समाजजीवन ढवळून निघाले. तिघांच्या फाशीच्या शिक्षेने न्याय मिळाला. तिघा आरोपींच्या कुटुंबाने गाव सोडले असले, तरी त्यांचे नातेवाईक गावात गुण्यागोविंदाने एकत्र नांदत असल्याने प्रचंड पोलीस बंदोबस्त असला तरी कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.
कर्जत-श्रीगोंदे रस्त्यावर कर्जतपासून २१ किलोमीटर अंतरावर कोपर्डी हे गाव आहे. कुकडीचे पाणी मिळत असल्याने भाजीपाला येथून मुंबईला तर डाळिंब सोलापूरला जाते. सोळाशे लोकसंख्या असलेल्या या गावात लोक वस्त्यांवर राहतात. लवनवस्ती, हरिनवस्ती, तुकाईवस्ती अशा चार-पाच वस्त्यांवर लोक शेतात राहतात. गाव म्हणजे दहा-बारा घरे व सात-आठ दुकाने होय. आज ही दुकाने बंद होती. निकाल असल्याने पोलीस बंदोबस्त प्रचंड होता. घटना घडली तेव्हापासून पीडित मुलीचे आई-वडील हे लवनवस्ती येथे असलेल्या घरी पुन्हा गेलेले नाही. ते शेतात भावाकडे राहत आहेत. त्यांनी मुलीच्या आठवणीने जुने दगडमातीचे घर सोडले. आज खटल्याचा निकाल ऐकण्यासाठी आज पीडित मुलीचे आई-वडील, नातेवाईक व गावातील प्रमुख नागरिक हे नगरला गेले होते. गावात महिला घरी होत्या. पीडित मुलीच्या घरी तिची आजी एकटीच होती. पाहऱ्यावर असलेल्या पोलिसांनी आरोपींना फाशी दिल्याची माहिती आजीला दिली. त्या वेळी छकुलीच्या आठवणीने त्यांनी हंबरडा फोडला.

आठवणी दाटल्या
वाहिन्या व माध्यमाच्या प्रतिनिधींशी बोलताना आजीने छकुलीच्या आठवणी सांगितल्या. त्यांनी छकुलीला संपविले, त्यांचे वाटोळे झाले, कुणाच्या पदरात काही पडले नाही. काय मिळाले त्यांना, असा मन हेलावून टाकणारा सवाल त्यांनी केला.
निकाल लागल्यानंतर संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ता डॉ. शिवानंद भानुसे, जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे, टिळक भोस, नीलेश तनपुरे, राहुल नवले, दीपक तनपुरे हे कोपर्डी येथे आले. आज ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी छकुलीच्या स्मृतिस्तंभावर फुले वाहिली.
छकुली देव्हाऱ्यात
मयत छकुलीचा फोटो हा पीडित कुटुंबाने देव्हाऱ्यात ठेवला आहे. तसेच आता शिवाजी महाराजांचा पुतळा घरात आहे. दोन पत्र्याच्या खोलीत हे कुटुंब राहते.
खटल्याचा निकाल लागण्यापूर्वी काही क्षण अगोदर छकुली ज्या शाळेत शिकत होती. त्या कुळधरण येथील नूतन मराठी विद्यालयात व कोपर्डी येथील मराठी शाळेत आरोपींना फाशी व्हावी, अशी प्रार्थना विद्यार्थ्यांनी केली.