Menu

देश
प्रियकराने हिंदू धर्म स्वीकारल्यावरच लग्न करणार; तरुणीचा न्यायालयात जबाब

nobanner

केरळमधील लव्ह जिहादचे प्रकरण ताजे असतानाच राजस्थानमधील जोधपूरमध्ये एका तरुणीने प्रियकराने हिंदू धर्म स्वीकारावा अशी अट ठेवली आहे. मुस्लीम तरुणासोबत पळून गेलेल्या तरुणीने न्यायालयात जबाब दिला आहे. ‘प्रियकराने हिंदू धर्म स्वीकारला तरच मी त्याच्याशी लग्न करणार’ असे पीडितेने न्यायालयात म्हटले आहे.
जोधपूरमध्ये राहणारी २० वर्षांची तरुणी मंगळवारी तिचा प्रियकर मोहसिन खानसोबत पळाली होती. मोहसिन हा टॅक्सीचालक आहे. मुलगी घरी न परतल्याने कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला. शेवटी हे प्रकरण पोलिसांकडे पोहोचले. पोलिसांनी मिसिंगची तक्रार दाखल करत तपासाला सुरुवात केली. पोलिसांनी तरुणीला तिच्या प्रियकरासह बिकानेरमधून ताब्यात घेतले. दोघांना बुधवारी जोधपूरमधील पोलीस ठाण्यात नेण्यात आले. हे वृत्त हिंदुत्ववादी संघटनांना समजले आणि त्यांनी पोलीस ठाण्याबाहेर गर्दी केली. हे ‘लव्ह जिहाद’चे प्रकरण असल्याचा आरोप करत संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजीला सुरुवात केली. काही कार्यकर्त्यांनी मोहसिनला मारहाण देखील केली. शेवटी कडेकोट बंदोबस्तात मोहसिन आणि त्या तरुणीला न्यायालयात नेण्यात आले.
न्यायालयात तरुणीने जबाब दिला आहे. मी स्वेच्छेने मोहसिनसोबत पळाले. मोहसिनने हिंदू धर्म स्वीकारल्याशिवाय मी त्याच्याशी लग्न करणार नाही, असे तिने न्यायालयात सांगितले. तरुणीने तिच्या घरी जाण्यास नकार दिला आहे. मोहसिनने धर्मांतर करेपर्यंत मी माझ्या चुलत बहिणीच्या घरी राहणार असे तिने सांगितले आहे. मुलगी सज्ञान असून ती तिचे निर्णय घेण्यास सक्षम आहे. त्यामुळे औपचारिक प्रक्रिया पूर्ण झाल्यावर आम्ही तिला चुलत बहिणीच्या घरी पाठवले, असे पोलिसांनी सांगितले. तरुणीने या वादावर प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.