खेल
वनडेत डबल धमाका करणारा रोहित एकमेव फलंदाज
भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांची कसोटी मालिका गुरुवारपासून सुरु होतेय. पश्चिम बंगालच्या ईडन गार्डनच्या मैदानावरुन श्रीलंका आणि भारत यांच्यातील मालिकेला सुरुवात होणार आहे. याच मैदानावर १३ नोव्हेंबर २०१४ या दिवशी सलामीवीर रोहित शर्माने श्रीलंकेविरुद्ध धमाकेदार खेळी केली होती. रोहित शर्माने २६४ धावा करत वनडेतील दुसरे द्विशतक झळकावले होते. श्रीलंकेविरुद्धची ही खेळी रोहितच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील सर्वोच्च खेळी आहे. या सामन्यात रोहित शर्मा अवघ्या ४ धावांवर खेळत असताना थिसारा परेराने त्याला जीवनदान दिले. त्यानंतर रोहितने मागे वळून पाहिले नाही. रोहित शर्माने ३३ चौकार आणि ९ षटकारांच्या मदतीने द्विशतक साजरे केले.
रोहित शर्मा असा एकमेव फलंदाज आहे की, ज्याने एकदिवसीय सामन्यात दोनवेळा द्विशतक झळकावले आहे. यापूर्वी त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध २०९ धावांची खेळी साकारली होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मैदानात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने २०१० मध्ये वनडेतील पहिलं वहिलं द्विशतक झळकावलं होतं. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नाबाद २०० धावांची खेळी केली होती. त्यानंतर २०१३ मध्ये रोहित शर्माने कांगारुंविरुद्ध कारकिर्दीतील पहिलं द्विशतक झळकावलं. तर वेस्ट इंडिजचा धमाकेदार फलंदाज ख्रिस गेलने झिम्बाब्वेविरुद्ध २१५ धावांची खेळी केली असून, न्यूझीलंडच्या मार्टिन गप्तिलने वेस्ट इंडिजविरुद्ध २३७ धावांची नाबाद खेळी करत द्विशतक ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत स्थान मिळवले होतं. भारताचा धमाकेदार फलंदाज वीरेंद्र सेहवागने वेस्ट इंडिजविरुद्ध २१९ धावांची तुफानी खेळी केली होती.