देश
संघ कार्यकर्त्याच्या हत्येप्रकरणी तिघेजण गजाआड
गुरुवायूरमध्ये के आनंदन या संघ कार्यकर्त्याची अत्यंत क्रूरपणे हत्या झाली. या हत्येप्रकरणी तिघांना गजाआड करण्यात आले आहे. रविवारी दुपारच्या सुमारास के आनंदन हा संघ कार्यकर्ता त्याच्या बाईकवरून चालला होता. त्याचवेळी त्याला एका कारने धडक दिली. या कारमधून उतरलेल्या हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी त्याच्यावर हल्ला चढवला. या घटनेत आनंदन गंभीर जखमी झाला. त्याला रूग्णालयात उपचारांसाठी नेत असतानाच त्याचा मृत्यू झाला. ब्रह्मकुलम येथे राहणाऱा आनंदन हा २०१३ मध्ये माकपच्या एका कार्यकर्त्याच्या हत्येप्रकरणातील आरोपी होता. त्याची जामिनावर सुटका करण्यात आली होती.
माकपाच्या नेत्यांनीच के आनंदची हत्या घडवून आणल्याचा आरोप भाजपने केला. तर याप्रकरणातील दोषींना लवकरात लवकर गजाआड करण्यात येईल असे आश्वासन पोलिसांनी दिले होते, जे पोलिसांनी पाळले असून या हत्या प्रकरणात तिघांना गजाआड करण्यात आले आहे. डाव्यांकडून सुरु असलेला हिंसाचार आणि रक्तपात थांबलेला नाही. केरळमध्ये जंगलराज सुरु आहे अशी टीका भाजपचे केरळचे प्रदेशाध्यक्ष राजशेखरन यांनी केली. तर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनीही या घटनेचा निषेध केला आहे. या हत्येमागे दुसरेतिसरे कोणीही नसून डावेच आहेत असाही आरोप अमित शहा यांनी त्यांच्या ट्विटमध्ये केला.
दरम्यान, २००१ नंतर केरळमध्ये आतापर्यंत आपल्या १२० कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आली असून यातील ८४ जण एकट्या कन्नूर येथील असल्याचा भाजपचा आरोप आहे.