Menu

देश
एपीआय अश्विनी ब्रिदे बेपत्ता प्रकरण; पोलीस निरीक्षकाला ठाण्यातून अटक

nobanner

सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे- गोरे यांचे अपहरण केल्याप्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर यांना अटक केली आहे. गेल्या दीड वर्षांपासून अश्विनी बिद्रे- गोरे या बेपत्ता असून अभय कुरुंदकर यांनीच त्यांचे अपहरण केल्याचा आरोप अश्विनी यांच्या कुटुंबीयांनी केला होता.
पोलीस दलात सहायक पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या अश्विनी बिद्रे- गोरे यांची २०१५ मध्ये नवी मुंबईतील कळंबोली पोलीस ठाण्यात बदली झाली. मात्र त्या कंळबोली पोलीस ठाण्यात रुजू झाल्याच नाही. दीड वर्षांपासून त्या बेपत्ता आहेत. सांगलीत असताना अश्विनी बिद्रे- गोरे यांची पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर यांच्याशी ओळख झाली होती. कुरुंदकर आणि अश्विनी बिद्रे- गोरे यांच्यात वाद होता. या दोघांमधील वादाचे रेकॉर्डिंगही अश्विनी यांचे पती राजू गोरे यांच्या हाती लागले होते. याशिवाय कुरुंदकर अश्विनी बिद्रे यांना मारहाण करतानाचा सीसीटीव्ही फुटेजही नुकताच समोर आला होता. तुझ्या पतीला गायब करणार, अशा धमक्या कुरुंदकर यांनी अश्विनी यांना दिल्या होत्या.

अश्विनी यांच्या कुटुंबीयांनी कळंबोली पोलीस ठाण्यात कुरुंदकर यांच्याविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. मात्र पोलिसांनी कुरुंदकर यांच्यावर कारवाई केली नव्हती. हे प्रकरण मुंबई हायकोर्टातही पोहोचले होते. हायकोर्टानेही अश्विनी यांचा शोध घेण्याचे आदेश पोलिसांना दिले होते. मात्र प्रकरणातील तपास पुढे सरकत नव्हता. याच काळात कुरुंदकर यांची ठाण्यात बदली झाली. अश्विनी यांच्या कुटुंबीयांनी पाठपुरावा सुरुच ठेवला होता. गेल्या काही दिवसांपासून माध्यमांमध्येही या प्रकरणाची दखल घेतली गेली. शेवटी वाढत्या दबावानंतर पोलिसांनी कुरुंदकर यांना गुरुवारी ठाण्यातून अटक केली.