देश
औरंगजेब राजवटीबद्दल काँग्रेसचं अभिनंदन; राहुल गांधींवर मोदींचा हल्लाबोल
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरातमध्ये सभेला संबोधित करताना काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींवर तुफान हल्लाबोल केला आहे. ‘औरंगजेब राजवटीबद्दल काँग्रेसचे अभिनंदन,’ अशा शब्दांमध्ये मोदींनी काँग्रेस आणि राहुल गांधींना लक्ष्य केले. आज राहुल गांधींनी पक्षाच्या अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावरुन मोदींनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. काँग्रेसमध्ये घराणेशाही असल्याचेही त्यांनी म्हटले.
‘औरंगजेब राजवटीबद्दल काँग्रेसचे अभिनंदन. मात्र आमच्यासाठी लोकांचे कल्याण महत्त्वाचे आहे. १२५ कोटी जनताच आमची हायकमांड आहे,’ अशा शब्दांमध्ये मोदींनी काँग्रेसच्या हायकमांड संस्कृतीवर तोफ डागली. ‘काँग्रेस हा पक्ष नसून त्यामध्ये केवळ एका कुटुंबाचाच शब्द अंतिम असतो, हे काँग्रेसच्याच नेत्यांनी मान्य केले आहे’, असेही ते म्हणाले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणीशंकर अय्यर यांच्या विधानाचा संदर्भ देऊन मोदींनी ही टीका केली. ‘शहाजहानच्या जागी जहांगीर आला, त्यावेळी निवडणूक झाली होती का?, शहाजहानच्या जागेवर औरंगजेब आला, त्यावेळी निवडणूक पार पडली होती का? त्यावेळीही निवडणूक झाली नव्हती. कारण सत्तासूत्रे राजाकडून त्याच्या मुलाकडे जाणार, याची सर्वांना कल्पना होती,’ असे अय्यर यांनी म्हटले होते. त्यांच्या या विधानावरुन मोदींनी काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणूक प्रक्रियेवर टीकेची झोड उठवली.
‘काँग्रेस हा एका कुटुंबाचा पक्ष आहे का?’, असा प्रश्न उपस्थित करत ‘आम्हाला औरंगजेब राज नको,’ असे मोदींनी म्हटले. ‘काँग्रेस पक्षाला गुजरातमधील नेतृत्त्व म्हणून मान्य होत नाहीत. काँग्रेसला गुजरातमधील नेते चालत नाही,’ असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी राहुल गांधींच्या मंदिर भेटींवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ‘याआधी काँग्रेसकडून कायम धर्मनिरपेक्षतेची भाषा केली जायची. मात्र आता काँग्रेस नेते कुठे जातात, हे आपण पाहात आहोत. मात्र मुस्लिम समाजाला काँग्रेसचा खरा चेहरा माहीत आहे, हे काँग्रेसचे दुर्दैव आहे,’ अशा शब्दांमध्ये मोदी राहुल गांधींच्या मंदिर भेटींवर बरसले.
गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. गुजरातमध्ये २२ वर्षांपासून सत्तेत असलेल्या भाजपसमोर यंदा काँग्रेसने आव्हान उभे केले आहे. त्यातच पाटीदार, ओबीसी आणि दलित समाजाची नाराजी भाजपसाठी तापदायक ठरत आहे. मात्र तरीही भाजपला १५० जागा मिळतील, असा विश्वास भाजप अध्यक्ष अमित शहांनी व्यक्त केला. यासोबतच भाजपला सत्ताविरोधी वातावरणाचा फटका बसल्याची कबुलीही त्यांनी दिली. मात्र विकासाच्या मुद्द्यावर जनता भाजपला साथ देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.