खेल
बुद्धिबळाचे ‘बोध’ चिन्ह!
‘‘काय हे बोधचिन्ह! लहान मुलेपण हे बोधचिन्ह बघतील याची जरा तरी जाणीव ठेवावी आयोजकांनी!’’ हे उद्गार आहेत माजी जागतिक महिला बुद्धिबळ विश्वविजेत्या सुसान पोल्गारचे, तर आर्टर पेट्रोस्यान म्हणतो, ‘‘ही तर कामसूत्रमधली छबी आहे. हे कसले बोधचिन्ह?’’ मात्र ह्या बोधचिन्हाला पाठिंबा देणारे लोक पण आहेत, लंडनमधल्या स्पर्धाचा आयोजक माल्कम पेनसारखे! ‘‘मला आवडले हे बोधचिन्ह,’’ माल्कमची प्रतिक्रिया.
लंडन या शहराचे आणि खेळांमधल्या बोधचिन्हांचे काहीतरी वाकडे असावे, कारण पुन्हा एकदा लंडन येथे होणाऱ्या जागतिक बुद्धिबळ स्पर्धेच्या बोधचिन्हाने बुद्धिबळ खेळल्या जाणाऱ्या १६० देशांमध्ये चच्रेची राळ उडवून दिली आहे. २०१२ साली लंडन येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या बोधचिन्हाने अशीच वादावादी झाली होती. त्या बोधचिन्हामधून अनेकांनी अनेक निष्कर्ष काढले होते. इराणने तर हे बोधचिन्ह बदलले नाही, तर ऑलिम्पिकवर बहिष्कार टाकण्याची भाषा केली होती. काही जणांना तर त्यामध्ये नाझी जर्मनीच्या ‘एसएस’ भास होत होता.
पण लंडन ऑलिम्पिकच्या वादाने थोडय़ा दिवसात राम म्हटला होता, कारण त्या सामान्य बोधचिन्हामधून कोणतेही निष्कर्ष काढणे शक्य होते. जसे आपल्याला आकाशात वेगवेगळ्या आकृती दिसतात. परंतु लंडन जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेच्या बोधचिन्हाकडे पाहिले कुणालाही सहज त्यामधली अश्लीलता दिसेल, असे एका स्वीडीश ग्रँडमास्टरने म्हटले आहे. पण हे बोधचिन्ह आहे तरी काय आणि त्यामागचे डोके कोणाचे याची आपण जरा चौकशी करू या.
‘‘गेली एक वर्ष आम्ही आणि मॉस्कोमधली कंपनी ‘शुका डिझाइन’ या बोधचिन्हावर काम करीत आहोत, ‘‘जागतिक बुद्धिबळ संघटनेचा प्रवक्ता म्हणाला. ‘‘जेथे ही स्पर्धा होणार आहे त्या लंडन शहराचे वैशिष्टय़ म्हणून हे बोधचिन्ह चपखल बसेल अशी आम्हाला खात्री आहे.’’ पण शुका डिझाइनच्या मॉस्कोमधील कलाकारांनापण या बोधचिन्हावरील प्रतिक्रियेमुळे धक्का बसला आहे. लोक उघड उघड या बोधचिन्हाची टर उडवतील याची या कलाकारांना कल्पनाच नव्हती. इतके हे कलाकार वास्तवापासून दूर आहेत, की रशियामध्ये सगळ्यांच्या संवेदना एवढय़ा बोथट झाल्या आहेत?
इवान वासीन आणि इवान वेलीचेन्को हे दोघे शुका डिझाइन सर्जनशील दिग्दर्शक आहेत. त्यांचे मत असे आहे की बुद्धिबळ हा खेळ परस्परांपासून दूर राहून खेळावयाचा खेळ आहे, पण त्यामध्ये एक युद्ध आहे मानसिक पातळीवर लढले जाणारे आणि या खेळामध्ये भावनांना खूप महत्त्व आहे. आम्हाला तेच या बोधचिन्हातून दाखवायचे आहे.
अनेक ग्रँडमास्टर यावर प्रतिक्रिया देत आहेत. विश्वनाथन आनंदच्या मते त्याला बुद्धिबळाचा पट खटकतो आहे. त्या बोधचिन्हामध्ये बुद्धिबळाचा पट ८ बाय ८ न दाखवता ६ बाय ६ दाखवला आहे आणि प्यादे पहिल्या पट्टीत दाखवले आहे. आनंद मिश्कीलपणे म्हणतो की, ‘‘या बोधचिन्हामुळे बुद्धिबळाला दूरचित्रवाणीवर रात्री १० नंतरचा वेळ नाही दिला म्हणजे मिळवले.’’ जागतिक बुद्धिबळ संघटनेचा कायमचा टीकाकार नायजेल शॉर्ट हा ब्रिटिश ग्रँडमास्टर म्हणतो की, ‘‘जागतिक संघटनेला बुद्धिबळ खेळाला कसे वागवायचे आहे याचे हे बोधचिन्ह प्रातिनिधिक चित्र आहे.’’
ऑस्ट्रेलियाचा ग्रँडमास्टर डेव्हिड स्मेरडॉन म्हणतो की, ‘‘हा बहुधा एक विनोद असावा.’’ परंतु अमेरिकन कवयित्री हेदर ख्रिस्तील मिश्कीलपणे म्हणाली, ‘‘मी काही बुद्धिबळ खेळत नाही, पण खेळण्यासाठी असे बसतात याची मला कल्पना नव्हती.’’ सुसान पोल्गारने तर हे बोधचिन्ह बदलण्याची मागणी केली आहे. बहुसंख्य मुले बुद्धिबळ खेळतात आणि त्यांच्या मनावर वाईट परिणाम होईल असे तिला वाटते. माझ्या मनात एक कल्पना येते आहे की समजा ही स्पर्धा भारतात होणार असती आणि जागतिक संघटनेने मुंबई शहरासाठी हे बोधचिन्ह बनवले असता तर त्या आयोजकांना सर्व जाती-धर्मीयांना एकत्र आणल्याचे श्रेय मिळाले असते, कारण सगळे भारतीय एक होऊन या स्पर्धेवर तुटून पडले असते.