देश
भारतीय जवान दररोज दहशतवाद्यांना वेगाने संपवत आहेत
‘आपल्या शेजारी देश पाकिस्तानला काय झालंय कुणास ठाऊक प्रत्येक वेळी पाकिस्तानकडून जम्मू-काश्मीरमध्ये काहीतरी कुरापती काढल्या जातात. मात्र, आपले साहसी जवान दररोज २, ४, ५, ६, ७ दहशतवाद्यांना धडाधड संपवत आहेत,’ असे उद्गार केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी काढले आहे. ते गुजरातमधील महुधा येथे एका कार्यक्रमादरम्यान बोलत होते.
पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. त्याचबरोबर पाक पुरस्कृत दहशतवादी कारवायांमध्येही वाढ झाली आहे. मात्र, आपले जवान पाकिस्तानच्या या कृतीला सडेतोड उत्तर देत आहेत. २०१७ मध्ये आजवर भारतीय सैन्याने २०० दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्याचे यावेळी राजनाथ यांनी सांगितले.
राजनाथ म्हणाले, ‘महात्मा गांधी आणि सरदार पटेल यांच्यामुळे गुजरातला वलय निर्माण झाले आहे. त्यानंतर स्वतंत्र भारतात अशी व्यक्ती झाली ज्याने जगभरातील कानाकोपऱ्यात गुजरातला प्रसिद्ध करुन टाकले ती व्यक्ती म्हणजे नरेंद्र मोदी,’ अशा शब्दांत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची स्तुती केली. ‘माझ्या काँग्रेसमधील मित्रांना मी विचारतो की, त्यांना हे सत्य स्विकारण्यात काही अडचण आहे का?’ असा सवालही त्यांनी यावेळी केला.