देश
मुंबईतील लोकल ट्रेनच्या महिला डब्यांना भगवा रंग?
मुंबईची लोकल ट्रेन ही मुंबईची रक्त वाहिनीच मानली जाते. मुंबईच्या वेगाची सर्वात मोठी साक्षीदार म्हणजे ही लोकल. या लोकलमध्ये महिला आणि मुलींची छेडछाड केल्याचे प्रकार गेल्या काही दिवसात उघडकीला आले. याच पार्श्वभूमीवर मुंबई लोकल ट्रेनच्या महिला डब्यांना भगवा रंग देण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे समजते आहे. भगवा रंग हा धैर्य आणि शौर्याचा रंग आहे. त्याग आणि धाडसाचा रंग आहे त्यामुळे हा रंग दिला तर महिलांचे डबे लगेच लक्षात येतील. तसेच या डब्यांतून प्रवास करणाऱ्या महिलांचे मनोधैर्य उंचावण्यास मदत होईल असे रेल्वेने त्यांच्या प्रस्तावात म्हटले आहे. या महिलांवर छेडछाडीचा प्रसंग आलाच तर प्रसंगाशी दोन हात करण्यासाठी हा रंग महिलांना आणि मुलींना प्रेरणाही देईल असेही रेल्वेने प्रस्तावात म्हटले आहे.
‘रेल्वे प्रोटेक्शन फोर्स’चे अतिरिक्त मुख्य सुरक्षा आयुक्त प्रणव कुमार यांच्यापुढे हा प्रस्ताव ठेवण्यात आला. सध्या मुंबईतील लोकल ट्रेनला सरसकट एकच रंग आहे. महिलांच्या डब्यावर फक्त महिलेचे चित्र आणि महिला डबा असे लिहिलेले असते. या डब्यातून पुरुषांना प्रवास करण्यास मज्जाव आहे. मागील वर्षात २,४११ केसेस अशा आहेत ज्यामध्ये पुरुषांनी महिला डब्यात बेकायदा प्रवेश केला. नियम मोडल्यास ५०० रुपयांचा दंडही ठोठावण्यात येतो. मात्र रेल्वेने आता लोकलमधील महिला डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा आणि महिला आरपीएफ नेमण्याचाही निर्णय घेतला आहे.
महिला आणि लहान मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने नेमकी काय काळजी घेता येईल? याबाबत रेल्वे बोर्डाने प्रत्येक विभागाकडून माहिती मागवली होती. त्यामध्ये रेल्वेकडूनच ही सूचना करण्यात आली आहे. मात्र भगवा रंग देण्याचा प्रस्ताव सध्या चांगलाच चर्चेत आहे. महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेनेचे सरकार आहे. हिंदूत्त्व हा दोन्ही पक्षांचा अजेंडा आहे. दोन्ही पक्षांचे धोरण पाहता भगव्या रंगाला विशेष स्थान आहे. त्यामुळे या बातमीची चर्चा चांगलीच रंगली आहे.