देश
मोदी आवडतात पण मनमोहन सिंग माझे चांगले मित्र
बराक ओबामांचे चांगले मित्र कोण… मोदी की मनमोहन सिंग, असा प्रश्न नेहमीच चर्चेत असतो. या प्रश्नाचे उत्तर अखेर बराक ओबामांनीच दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मला आवडतात. त्यांच्याकडे चांगला दृष्टीकोन आहे. भारतातील प्रशासकीय व्यवस्थेचे आधुनिकीकरण करण्याचे काम ते करत आहेत असे सांगतानाच माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे देखील माझे मित्र आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.
‘हिंदुस्तान टाइम्स लीडरशिप समीट’ या कार्यक्रमात शुक्रवारी बराक ओबामा उपस्थित होते. नरेंद्र मोदी आणि ओबामा यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंधांवर माध्यमांमध्ये नेहमीच चर्चा रंगते. ओबामा यांच्या भारत दौऱ्यात नरेंद्र मोदींनी ‘माझे मित्र बराक’ असा उल्लेख केला होता. शुक्रवारी कार्यक्रमात ओबामांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला. स्मितहास्य करत ओबामा काही क्षण थांबले आणि मग म्हणाले, मला मोदी आवडतात. ते देशाच्या प्रशासकीय व्यवस्थेच्या आधुनिकीकरणासाठी मेहनत घेत आहेत. पण माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे देखील माझे चांगले मित्र आहेत, असे त्यांनी आवर्जून नमूद केले. २००९ मधील आर्थिक मंदीच्या काळात पंतप्रधान मनमोहन सिंग यांची खूप मदत झाली होती, असे त्यांनी सांगितले. भारत- अमेरिका संबंधांवरही ओबामा यांनी भाष्य केले आहे. भारत आणि अमेरिका एकत्र आल्यास जगातील कोणत्याही समस्येवर तोडगा काढता येईल, असे त्यांनी सांगितले.
बराक ओबामा यांनी यापूर्वीही मनमोहन सिंग यांचे कौतुक केले आहे. एका परिषदेत ओबामा म्हणाले होते की मनमोहन सिंग जेव्हा बोलतात तेव्हा सर्वांचे लक्ष त्यांच्याकडेच असते. शेवटी ते उत्तम अर्थतज्ज्ञ आहेत.मनमोहन सिंग यांना तर मनमोहन सिंग यांच्या अमेरिका दौऱ्यात ओबामांनी मनमोहन सिंग यांच्यासोबतच्या मैत्रीचा उल्लेख केला होता. मनमोहन सिंग यांच्या अमेरिका दौऱ्यात ओबामा शिरस्ता सोडून सिंग यांना निरोप देण्यासाठी ओव्हल कार्यालयाच्या दरवाजापर्यंत सोडायला यायचे.