Menu

देश
रेडिओ कॉलर लावलेल्या वाघिणीचे ७० किमी स्थलांतरण

nobanner

ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प ते उमरेड-करांडला अभयारण्य

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील रेडिओ कॉलर लावलेल्या वाघिणीने सुमारे ७० किलोमीटर अंतर पार करत थेट उमरेड-करांडला अभयारण्य गाठले. या घटनेमुळे स्वत:चे अस्तित्त्व निर्माण करण्यासाठी वाघ मोठा पल्ला पार करून जाऊ शकतात हे पुन्हा सिद्ध झाले आहे.

वाघांचे स्थलांतरण यापूर्वीही होत असले तरी अलीकडच्या काळात अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे आणि वन्यजीव अभ्यासकांमुळे या घटना समोर येत आहेत. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोळसा रेंजमधील शिवनझरी येथील ही वाघीण आहे. उमरेड-करांडला अभयारण्यातील पवनी हे क्षेत्र या वाघिणीने निवडले आहे. वनखात्याने वयात येणाऱ्या वाघांना कॉलर लावण्याची एक मोहीम मधल्या काळात राबवली होती. शिवणझरी येथे प्रत्येकी दोन वाघ, वाघिणीचे अस्तित्त्व आहे. त्यातील प्रत्येकी एका वाघ,वाघिणीला देहरादून येथील भारतीय वन्यजीव संस्थेचे संशोधक हबीब बिलाल व त्यांच्या चमूने रेडिओ कॉलर लावले होते. पुण्यातील वन्यजीवप्रेमी प्रणव जोशी व त्यांच्या सहकाऱ्यांना उमरेड-करांडला अभयारण्यात सफारीदरम्यान अवघ्या अडीच वष्रे वयाची ही वाघीण दिसली. त्यांनी तिचे छायाचित्र काढून वन्यजीवप्रेमी विनित अरोरा यांना दाखवले. ते पाहिल्यानंतर त्यांना ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातीलच ही वाघीण असल्याचे लक्षात आले. तरीही हे स्पष्ट करण्यासाठी त्यांनी त्यांच्याकडील छायाचित्रे व प्रणव जोशी यांनी काढलेली छायाचित्रे तपासली. वाघिणीच्या अंगावरील पट्टे आणि खुणांवरुन ही ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कॉलर लावलेली वाघीण असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान भारतीय वन्यजीव संस्थेच्या संशोधकांनीही यावर शिक्कामोर्तब केले.

उमरेड-करांडला अभयारण्यातील पवनी क्षेत्रात जयचंद हा वाघ आणि राई ही वाघीण आहे. या दोघांचे चार बछडे देखील त्याठिकाणी आहे. गेल्या महिन्यातच जयचंदचे राईबरोबर दोन-तीनदा मेटिंग झाले असल्याने येत्या काही दिवसात पुन्हा वाघाचे बछडे दिसून येऊ शकतात. त्यामुळे वाघ आला असता तर जयचंद आणि त्या वाघामध्ये अस्तित्त्व कायम राखण्यासाठी लढाई(टेरिटोरियल फाईट) होऊ शकली असती. त्यातून एखाद्या वाघाचा बळी गेला असता. मात्र, वाघीण असल्यामुळे ही लढाई टळली, असे वन्यजीव अभ्यासकांनी सांगितले.

सुमारे १५ ते १६ पर्यटकांच्या जिप्सी आज या अभयारण्यात होत्या, पण यापैकी कुणालाही वाघिणीचे दर्शन झाले नाही. आम्हाला मात्र कॉलर केलेली ही वाघीण दिसली आणि तिची छायाचित्र देखील मिळाली. ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला मिळालेली ही आजवरची सर्वात मोठी भेट आहे, असे पुण्यातील वन्यजीवप्रेमी प्रणव जोशी यांनी सांगितले.