खेल
रोहितकडून आज नाताळभेट
तिसऱ्या लढतीमधील विजयासह मालिकेत निर्भेळ यश मिळवण्यासाठी भारतीय संघ उत्सुक
लिटिल-मास्टर सुनील गावस्कर, मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरनंतर मुंबईकर फलंदाज रोहित शर्मा ‘फास्टर-ब्लास्टर’ म्हणून उदयास येत आहे. आठवडय़ाभरापूर्वी एकदिवसीय क्रिकेटमधील तिसरे द्विशतक झळकावणाऱ्या रोहितने इंदूरमध्ये ट्वेन्टी-२० क्रिकेटमधील विश्वविक्रमाची बरोबरी साधणारी वेगवान शतकी खेळी साकारून आपल्या जबरदस्त फॉर्मचा प्रत्यय दिला आहे. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत कुशल नेतृत्व आणि फलंदाजीचा वादळी बहर या बळावर एकदिवसीय मालिका भारताला जिंकून दिल्यानंतर आता श्रीलंकेविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेत निर्भेळ यशाचा संकल्प रोहितने केला आहे. रविवारी म्हणजेच नाताळच्या पूर्वसंध्येला वानखेडे स्टेडियमच्या घरच्या मैदानावर भारताच्या विजयासह आणखी एका खास खेळीची भेट रोहितने द्यावी, अशी मुंबईकर क्रिकेटरसिकांची इच्छा आहे.
कसोटी मालिकेत श्रीलंकेला आरामात नमवल्यानंतर भारताने एकदिवसीय मालिका २-१ अशा फरकाने जिंकली. मग ट्वेन्टी-२० मालिकेतील कटकच्या पहिल्या लढतीत भारताने ९३ धावांनी विजय मिळवला, तर दुसऱ्या सामन्यात शुक्रवारी ८८ धावांनी दिमाखदार विजय साजरा केला. त्यामुळे २-० अशा फरकाने मालिकेवर कब्जा करणारा भारतीय संघ बसिल थम्पी, वॉशिंग्टन सुंदर आणि दीपक हुडा यांना संधी देईल अशी अपेक्षा आहे. परंतु आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्याच्या पाश्र्वभूमीवर आत्मविश्वास उंचावण्यासाठी भारतीय संघ अखेरच्या लढतीवरही वर्चस्व गाजवण्यासाठी उत्सुक आहे.
श्रीलंकेच्या क्रिकेटसाठी २०१७ हे संपूर्ण वर्ष अत्यंत वाईट ठरले आहे. आता अखेरच्या ट्वेन्टी-२० सामन्याला सामोरे जाताना अष्टपैलू खेळाडू अँजेलो मॅथ्यूज दुखापतीमुळे खेळणार नसल्याचे स्पष्ट झाल्यामुळे श्रीलंकेच्या चिंतेत भर पडली आहे. त्या तुलनेत भारताने वर्षभर तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये आपल्या वर्चस्वपूर्ण कामगिरीसह छाप पाडली आहे. विराट, शिखर धवन आणि भुवनेश्वर कुमार यांच्यासारखे महत्त्वाचे खेळाडू नसतानाही युवा खेळाडू जबाबदारीने आपल्या भूमिका बजावत आहेत.
सलामीवीर लोकेश राहुलने दोन्ही सामन्यांत अर्धशतके साकारली आहेत. इंदूरमध्ये त्याचे शतक थोडक्यात हुकले होते. याशिवाय विराटच्या तिसऱ्या स्थानावर उतरणारा मुंबईकर फलंदाज श्रेयस अय्यर, मनीष पांडे आणि अनुभवी महेंद्रसिंग धोनी यांच्यावर भारताच्या फलंदाजीची भिस्त आहे. याचप्रमाणे गोलंदाजीत मनगटी फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव श्रीलंकेच्या फलंदाजांवर लीलया अंकुश ठेवत आहेत. जसप्रीत बुमराह आणि अष्टपैलू हार्दिक पंडय़ा यांच्यावर भारताच्या वेगवान माऱ्याची धुरा असली तरी जयदेव उनाडकट आपली गुणवत्ता सिद्ध करताना आशीष नेहराची जागा घेऊ पाहात आहे.
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, दिनेश कार्तिक, महेंद्रसिंग धोनी, हार्दिक पंडय़ा, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, दीपक हुडा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, बसिल थम्पी, जयदेव उनाडकट.
श्रीलंका : थिसारा परेरा (कर्णधार), उपुल थरंगा, अँजेलो मॅथ्यूज, कुशल जनीथ परेरा, दनुष्का गुणतिलका, निरोशान डिक्वेला, असीला गुणरत्ने, संदीरा समरविक्रमा, दसून शनाका, चतुरंगा डी’सिल्व्हा, सचिथ पथिराणा, धनंजया डी’सिल्व्हा, न्यूवान प्रदीप, विश्वा फर्नाडो, दुष्मंता चामीरा.