Menu

देश
अफझल गुरुच्या मुलाने १२वीच्या परिक्षेत मिळवले विशेष प्राविण्य

nobanner

संसदेवरील हल्लाप्रकरणी फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या दहशतवादी अफझल गुरु याचा मुलगा गालिब अफझल गुरु हा १२वीच्या परिक्षेत विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाला आहे. जम्मू-काश्मीर शिक्षण मंडळाच्या उच्च माध्यमिक परिक्षेचा निकाल गुरुवारी लागला यामध्ये त्याने घवघवीत यश मिळवले आहे.

गालिब हा बारावीला विज्ञान शाखेत शिकत होता. १०० मार्कांचा एक पेपर याप्रमाणे पाच विषयांतील एकूण ५०० गुणांपैकी ४४१ गुण त्याने मिळवले आहेत. इंग्रजी (८६), भौतिकशास्त्र (८७), रसायनशास्त्र (८९), जीवशास्त्र (८५), पर्यावरण शास्त्र (९४) असे गुण त्याने मिळवले आहेत. त्याच्या या यशाबद्दल राज्यातील विरोधी पक्ष नॅशनल कॉन्फरन्सच्या प्रवक्त्या सराह हयात यांनी त्याचे ट्विटरवरुन अभिनंदन केले आहे. तसेच त्याला भविष्यातील कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

जम्मू-काश्मीर शालेय शिक्षण मंडळाच्या माहितीनुसार, ५५,१६३ विद्यार्थी बारावीच्या परिक्षेला बसले होते. त्यांपैकी ३३,८९३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यांत ही परिक्षा झाली होती. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची एकूण टक्केवारी ६१.४४ आहे. यामध्ये ६१.३३ टक्के मुलींचे प्रमाण तर ५८.९२ टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत.

बारावीच्या परिक्षेत घवघवीत यश मिळवल्यानंतर मित्र परिवार आणि कुटुंबियांकडून गालिबवर सोशल मीडियाच्या माध्यामांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्याच्या बारामुल्ला जिल्ह्यातल्या सोपोर शहरातील घरी शुभेच्छा देणाऱ्यांनी गर्दी देखील केली आहे.