देश
जम्मू-काश्मीरमध्ये चकमकीत २ दहशतवाद्यांचा खात्मा
जम्मू- काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात मंगळवारी सकाळी चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. दोन्ही दहशतवाद्यांकडून शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला असून परिसरात सध्या शोधमोहीम सुरु असल्याचे समजते.
अनंतनाग जिल्ह्यातील कोकरनाग येथे दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. जम्मू-काश्मीर पोलीस, सैन्य, केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) यांच्या संयुक्त पथकाने मंगळवारी सकाळी परिसरात शोधमोहीम राबवली. यादरम्यान, दहशतवाद्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबार केला. जवानांनीही चोख प्रत्युत्तर देत दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. दोन्ही दहशतवाद्यांची ओळख पटवण्याचे काम सुरु असून परिसरात सध्या शोधमोहीम राबवली जात आहे. सध्या परिसराला जवानांनी वेढा घातला असून संपूर्ण परिसर खाली करण्यात आला आहे.
दरम्यान, सोमवारी देखील दहशतवाद्यांनी पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला केला होता. या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला होता.जम्मू-काश्मीरमध्ये १४ डिसेंबर २०१७ पर्यंत जवळपास २०६ दहशतवाद्यांचा चकमकीत खात्मा करण्यात आला. तर दहशतवाद्यांशी लढताना ७५ जवानांना वीरमरण आले. तर २०१६ मध्ये १५० दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले होते. २०१६ मध्ये हेच प्रमाण १५० आणि २०१५ हेच प्रमाण १०८ वर होते.