देश
टेंभुर्णीत बनावट नोटा छापखाण्यावर कारवाई, आरोपींची पोलिसांवर दगडफेक
बनावट नोटा छापखाण्यावर पुणे ग्रामीण पोलिसांनी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला धडक कारवाई केली. ही धडक कारवाई करताना आरोपींनी केलेल्या दगडफेकीत दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील टेंभुर्णी येथील टण्णू गावात ही कारवाई झाली.
बारामतीचे उपविभागीय अधिकारी बापूसाहेब बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरंग शिंदे आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी भिगवणमध्ये नकली नोटा पकडल्या. त्यानंतर टण्णू गावात रात्री सात वाजता छापा मारला असता नकली नोटा छापण्याचा कारखाना आणि काही जाळलेल्या नोटा आढळून आल्या.
दरम्यान, आरोपींनी पोलिसांवर दगडफेक केली. त्यावेळी श्रीरंग शिंदे आणि बापू हडागळे यांना डोक्याला आणि हाताला जबर मार लागला असून ते जखमी आहेत. त्यांच्यावर टेंभुर्णी येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
पकडण्यात आलेला आरोपी हा सराईत गुन्हेगार असून टेंभुर्णी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.