दुनिया
दहशतवादी हाफिज सईदच्या संस्थांवर पाकिस्तान सरकार टाच आणण्याच्या तयारीत
लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या आणि २६/११ चा मास्टरमाईंड तसेच कुख्यात दहशतवादी हाफिज सईद चालवत असलेल्या संस्थांवर टाच आणण्याची तयारी पाकिस्तान सरकारने सुरु केली आहे. हाफिज सईदशी संबंधित सगळ्या संस्था आणि त्याला पुरवठा करणाऱ्या आर्थिक संघटना यांच्यावर पाकिस्तान सरकारतर्फे कब्जा केला जाणार आहे. अमेरिकेने हाफिज सईद दहशतवादी असल्याचे जाहीर केले आहे. त्याचमुळे पाकिस्तानने ही कारवाई सुरु केली आहे. मिळालेल्या अहवालानुसार हाफिज सईद देणगी देत असलेल्या आणि स्वतः चालवत असलेल्या संस्थांवर कारवाई केली जाणार आहे. हाफिज सईदच्या मालमत्ताही ताब्यात घेण्यात येणार आहेत. ही कारवाई नेमकी कशी करायची याबाबत नुकतीच एक बैठकही पार पडल्याचेही असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. १९ डिसेंबरलाच या संदर्भातली बैठक पार पडली आहे.
अमेरिकेने जमात-उद-दावा आणि फलाह-ए-इन्सानियत या दोन संघटना लष्कर-ए-तोयबाशी संलग्न असल्याचे स्पष्ट केले आहे. २६ नोव्हेंबर २००८ ला मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्याचाही हाफिज सईद हा मास्टरमाईंड आहे. पाकिस्तानने हाफिजला काही दिवस नजरकैदेत ठेवले होते. त्यानंतर त्याला नजरकैदेतून मुक्त करण्यात आले. ज्यामुळेही पाकिस्तानवर सर्व स्तरातून टीकाही झाली. आता पाकिस्तान सरकारने सईदशी संबंधित सर्व संस्थांवर टाच आणण्याचे ठरवले आहे. ‘टाइम्स नाऊ’ या वृत्तवाहिनीने या संदर्भातले वृत्त दिले आहे.