Menu

देश
भाजपा-आरएसएसकडून माझ्या हत्येचा कट

nobanner

दलित नेता आणि गुजरातमधील वडगामचे नवनिर्वाचित आमदार जिग्नेश मेवाणींनी आपल्या जिवाला धोका असल्याची भीती व्यक्त केली आहे. भाजपा आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघ आल्या हत्येचा कट करत असल्याचा आरोप त्यांनी केला. मलाही विहिंप नेते प्रवीण तोगडिया यांच्याप्रमाणे भीती वाटत आहे. काही लोक माझी हत्या करू शकतात, अशी मला भीती वाटत आहे. भाजपा आणि संघाचे लोक मला मारू शकतात. मला सूत्रांकडून समजले आहे की, त्या लोकांना मला त्यांच्या मार्गातून हटवायचे आहे, असे मेवाणी यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना म्हटले.

दरम्यान, मेवाणी यांना वाय दर्जाची सुरक्षा पुरवावी अशी मागणी काही दलित संघटना करत आहेत. या श्रेणीत आठ कमांडोंसह ११ सुरक्षा रक्षक तैनात असतात. गुजरातमधील विविध जिल्ह्यांमध्ये दलित संघटनांनी तेथील जिल्हाधिकाऱ्यांना याप्रकरणी निवेदन दिले आहे. वाय दर्जाच्या सुरक्षेबरोबरच दलित संघटनांनी मेवाणी आणि भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेख यांच्याविरोधात सुरू असलेले खटले मागे घेण्याची मागणी केली आहे. चंद्रशेखर सध्या उत्तर प्रदेशमधील तुरूंगात कैदेत आहे.

दरम्यान, विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी मंगळवारी माध्यमांशी बोलताना आपल्याला काही लोक मारू इच्छितात, असे म्हटले होते. हिंदूंकडून आवाज उठवत असल्यामुळे काही दिवसांपासून आपला आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे ते म्हणाले होते. मी देशाच्या सेवेसाठी दीड हजार डॉक्टर तयार केले आणि आता केंद्रातील आयबी मला मारू इच्छिते. केंद्राला मी याप्रकरणी पत्रही पाठवले आहे. आयबी मला घाबरवत आहे. माझा आवाज दाबण्यासाठी कायद्याचा भंग केल्याची प्रकरणे माझ्याविरोधात नोंदवण्यात आली आहेत, असे त्यांनी म्हटले होते.