देश
‘मोजो’चा मालक युग पाठकला १२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी
कमला मिल कंपाऊंडमधील आगीप्रकरणी अटक झालेल्या मोजो बिस्ट्रो या रेस्टोपबचा मालक युग कौशल पाठकला भोईवाडा न्यायालयाने १२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. युग पाठक हा पुण्याचे माजी पोलीस आयुक्त के. के. पाठक यांचा मुलगा आहे.
कमला मिल कंपाऊंडमधील ‘मोजो बिस्ट्रो’ आणि ‘वन अबव्ह’ या पबमध्ये २९ डिसेंबर रोजी रात्री भीषण आग लागली. या आगीत १४ जणांचा मृत्यू झाला होता. ‘वन अबव्ह’मध्ये पहिले आग लागली आणि नंतर ही आग पसरत मोजो बिस्ट्रोमध्ये गेल्याचा प्राथमिक अंदाज होता. यानुसार पोलिसांनी वन अबव्हच्या मालक आणि मॅनेजरविरोधात गुन्हा दाखल केला होता. मात्र अग्निशमन दलाने मुंबई महापालिका आयुक्तांना दिलेल्या अहवालात मोजो बिस्ट्रोमध्ये पहिले आग लागल्याचा दावा करण्यात आला होता.
अग्निशमन दलाच्या अहवालानंतर पोलिसांनी मोजो बिस्ट्रोच्या मालकांचा मूळ गुन्ह्यातील आरोपींमध्ये समावेश केला. शनिवारी संध्याकाळी पोलिसांनी मोजोचा मालक युग पाठकला अटक केली. रविवारी युगला न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला १२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
ग्राहकांचा हुक्का पेटता राहावा यासाठी कोळशाचे निखारे सातत्याने तयार केले जातात. निखारे हुक्क्याच्या भांड्यात भरताना किंवा हाताळताना ठिणग्या उडतात. या ठिणग्यांनी ‘मोजो ब्रिस्टो’मध्ये आग लागल्याचे समोर आले होते. या प्रकरणी पोलिसांनी युग पाठकसह युग तुली यालाही आरोपी केले आहे. युग तुलीला अद्याप अटक झालेली नाही.