देश
‘वन अबव्ह’चा तिसरा मालक अभिजित मानकरही अटकेत
लोअर परळ येथील कमला मिल परिसरातील इमारतीला लागलेल्या आग प्रकरणी पोलिसांनी ‘वन अबव्ह’ पबचा तिसरा मालक अभिजित मानकर यांना पोलिसांनी अटक केली. तत्पूर्वी बुधवारी रात्री उशिरा ‘वन अबव्ह’ चे मालक जिगर संघवी आणि कृपेश संघवी यांना मुंबईतून ताब्यात घेतले होते. या दोघांना वांद्रे परिसरातून अटक करण्यात आले. दोघेही मुंबईतून पळून जाण्याच्या तयारीत होते,असे समजते.
मानकरला पहाटेच्या सुमारास त्याच्या मित्राच्या घरातून अटक करण्यात आल्याचे ‘एबीपी माझा’ने म्हटले आहे. कमला मिलमध्ये ‘मोजो बिस्ट्रो’ आणि ‘वन अबव्ह’ या पबमध्ये २९ डिसेंबर रोजी रात्री भीषण आग लागली. या आगीत १४ जणांचा मृत्यू झाला होता.याप्रकरणी ‘वन अबव्ह’चे मालक अभिजीत मानकर, क्रिपेश आणि जिगर संघवी यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवला होता.
३० डिसेंबरच्या मध्यरात्री कमला मिल परिसरातील इमारतीला भीषण आग लागली होती. येथील मोजो ब्रिस्टो पबमधून या आगीला सुरुवात झाल्याचे अग्निशामक दलाच्या चौकशीत स्पष्ट झाले. त्यामुळे या पबच्या मालकांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्यात आले. दरम्यान, या दुर्घटनेनंतर युग तुली हा हैदराबाद विमानतळावर दिसून आल्याचे हैदराबाद पोलिसांनी मुंबई पोलिसांना कळवले आहे. त्यानंतर मुंबई पोलिसांच्या सुचनेनुसार हैदराबाद पोलीस आता तुलाचा शोध घेत आहेत. मात्र, अद्याप तो पोलिसांच्या हाती आलेला नाही.
कमला मिल आग प्रकरणाला कलाटणी देणारी कारवाई मंगळवारी मुंबई पोलिसांनी केली. देशभरातील बडय़ा सट्टेबाजांचा खबरी आणि अनेक भारतीय क्रिकेटपटूंचा मित्र विशाल कारिया याला ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी दिवसभराच्या चौकशीनंतर रात्री बेडय़ा ठोकल्या. गुन्हा नोंद झाल्यानंतर ‘वन अबव्ह’च्या मालकांना त्याने आश्रय दिल्याचे चौकशीअंती स्पष्ट झाल्याचे पोलिसांनी सांगितले.