देश
‘व्हॉट्सअॅप बिझनेस’च्या भारतात लॉन्चिंगचा मुहूर्त ठरला
व्हॉट्सअॅपकडून भारतातील यूजर्सना लवकरच नवीन गिफ्ट मिळणार आहे. कारण, गेल्याच आठवड्यात व्हॉट्सअॅपने जगभरातील अनेक देशांमध्ये आपलं नवं ‘बिझनेस अॅप’ लॉन्च केलं होतं. पण आता हे अॅप लवकरच भारतातही लॉन्च होणार आहे.
व्हॉट्सअॅप इंडियाकडून BGR India या टेक वेबसाईटला याबाबतची माहिती देण्यात आली आहे. BGR India च्या वृत्तानुसार, व्हॉट्सअॅपचं हे नवं अॅप याच आठवड्यात भारतात लॉन्च केलं जाईल. या नवीन अॅपचा सर्वाधिक फायदा लघु आणि मध्यम उद्योजकांना होईल, असं कंपनीकडून सांगण्यात येत आहे.
‘व्हॉट्सअॅप बिझनेस’ला 18 जानेवारी रोजी लॉन्च करण्यात आलं होतं. यानंतर हे अॅप अमेरिका, इंग्लंड, इटली, इंडोनेशिया आणि मॅक्सिकोमधील यूजर्सना गुगल प्ले स्टोअरवर फ्री डाऊनलोडसाठी उपलब्ध करुन देण्यात आलं.
काय आहेत फायदे?
या अॅपमुळे ग्राहकांना कंपन्यांशी किंवा संस्थांशी थेट संवाद साधता येईल. यासाठी एक पिवळा चॅटबॉक्स देण्यात येणार आहे. हा चॅटबॉक्स डिलीट करता येणार नाही. मात्र, एखाद्या कंपनीशी तुम्हाला बोलायचं नसेल, तर ब्लॉक करण्याचा पर्याय देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, व्हॉट्सअॅपचं हे नवीन अॅप्लिकेशन व्हॉट्सअॅप वेबवरुनही वापरता येईल.