देश
सिनेव्हिस्टा स्टुडिओतील आगीत एकाचा मृत्यू
कांजुरमार्गमधील सिनेव्हिस्टा स्टुडिओतील आगीत एकाचा मृत्यू झाला आहे. रविवारी सकाळी स्टुडिओत एका तरुणाचा मृतदेह सापडला असून गोपी वर्मा असे या तरुणाचे नाव आहे. दुर्दैवी बाब म्हणजे स्टुडिओतून सर्वांना सुखरुप बाहेर काढल्याचा दावा केला जात असतानाच गोपीचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे.
कांजुरमार्ग पश्चिमेला गांधीनगर परिसरातील सिनेव्हिस्टा स्टुडिओला शनिवारी रात्री भीषण आग लागली होती. आग लागली त्यावेळी स्टुडिओत ‘अंजली’ या मराठी मालिकेसह एकूण ४ मालिकांचे चित्रिकरण सुरु होते. कलाकारांसह एकूण १५० जण स्टुडिओत उपस्थित होते. या सर्वांना सुखरुप बाहेर काढल्याची माहिती देण्यात आली होती. अडीच तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग विझवण्यात आली. अग्निशमन दलाचे आठ फायर इंजिन आणि सहा पाण्याचे टँकरच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले होते. आगीचे नेमके कारण अजूनही अस्पष्ट आहे.
‘एबीपी माझा’ वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार रविवारी सकाळी स्टुडिओत एक मृतदेह सापडला. मृतदेहाची ओळख पटली असून गोपी वर्मा असे त्याचे नाव आहे. तो ऑडिओ असिस्टंट म्हणून काम करत होता. त्याला राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याची डॉक्टरांनी सांगितले.
स्टुडिओतून सर्वांना बाहेर काढल्याचा दावा केला जात होता. मग गोपी आत कसा अडकला, आपला सहकारी गायब असल्याचे अन्य कर्मचाऱ्यांना कसे लक्षात आले नाही, असे प्रश्न आता उपस्थित झाले आहेत. स्टुडिओला आग लागल्याची पाच महिन्यांतील ही दुसरी घटना आहे. सप्टेंबर २०१७ मध्ये चेंबूरमधील आर. के. स्टुडिओ जळून खाक झाला होता.
दरम्यान, मुंबईतील अग्नितांडवाचे सत्र सुरुच आहे. ४ जानेवारी रोजी अंधेरीत वातानुकूलन यंत्रामध्ये लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला होता. मैमून मंजिल येथे ही घटना घडली होती. त्यापूर्वी २९ डिसेंबर रोजी कमला मिल कंपाऊंडमधील वन अबव्ह व मोजो ब्रिस्टो या पबमध्ये आग लागल्याने १४ जणांचा मृत्यू झाला होता. तर १८ डिसेंबर रोजी साकीनाका भानू फरसाण मार्टमध्ये लागलेल्या आगीत १४ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला होता.