देश
दारूविक्रीविरुद्ध आंदोलनकर्त्यांची गळचेपी?
बंदी असलेल्या वर्धा जिल्ह्य़ात दारू विक्रेते व पोलीस यांच्यात साटेलोटे असल्याचा आरोप
जिल्हय़ातील वाढत्या अवैध दारूविक्रीला पोलिसांचेच संरक्षण मिळत असल्याचे ठोस पुरावे देणाऱ्या जनवादी महिला संघटनेच्या कार्यकर्त्यांची दारू विक्रेत्यांकडून होणारी गळचेपी थांबणार कधी, असा थेट प्रश्न उपस्थित करण्यात येतो. शासनाच्याच कामाला हातभार लावणाऱ्या या महिलांना आता पोलीस अधीक्षकपदी असणाऱ्या महिला अधिकाऱ्याकडून न्यायाची अपेक्षा आहे.
वर्धा जिल्हय़ात १९७५ पासून दारूबंदी लागू झाल्यानंतर आजतागायत ही बाब ‘वाऱ्यावरची वरात’ ठरल्याचे चित्र आहे.
दारूविक्रीची अनेक प्रकरणे दाखल झाली. कारवाईही होते. मात्र हेच एक काम पोलिसाचे काम उरले काय, असा हताश सवाल पोलीस यंत्रणेकडून येतो. पण पोलिसांसोबतच अवैध दारूविक्रीला आळ घालण्यासाठी जनवादी महिला संघटना श्रीमती प्रभाताई घंगारे यांच्या नेतृत्वात कार्यरत आहे. गत वीस वर्षांपासून या संघटनेने अवैध विक्रेत्यांना ‘सळो की पळो’ करून सोडले. पण पुढे विक्रेता व काही भ्रष्ट पोलिसांची हातमिळवणी या महिलांना तापदायक ठरत गेली. आजही जिल्हय़ातील ६८ गावांत संघटनेच्या हजारांवर महिला या कार्यात कटिबद्ध आहेत.
अवैध दारूविक्रीवर मधल्या काळात आवळलेला फास सैल पडल्याचे निदर्शनास आल्यावर संघटनेने महात्मा गांधींच्या पुण्यथीतीला परत दारूबंदीचे साकडे घातले. या वेळी तर कसलीच भीती न ठेवता दारूचा महापूर असणाऱ्या गावांची यादी पोलीस ठाण्यांसह जाहीर केली. ही बाब दारूबंदीच्या चळवळीत प्रथमच घडली. प्रामुख्याने ग्रामीण भागातील खरांगणा ठाण्यांतर्गत खरांगणा, मोरांगणा, आंजी, बोरगाव, कामठी, मजरा, हेटी, मदना, खरी, बोथली, पुलई, मांडवा, काचनूर, परखेडी, टेंभरी, तसेच सेलू ठाण्याच्या हद्दीतील रेहकी, हिंगणी, सेलू, धनोली, जामणी, आकोली, वडनेर व समुद्रपूर अंतर्गत खापरी, पिपरी व जाम, देवळी अंतर्गत अंदोरी, आंजी, वायगाव, तसेच पुलगाव, सावंगी, व सेवाग्राम अंतर्गत वायफड, लोणसावळी, डोरली, एमआयडीसी, वडद, सावंगी, पालोती या गावात दारूचा धुमाकूळ असल्याचे महिलांचे म्हणणे आहे. दारूमुळे कुटुंब उद्ध्वस्त होत असल्याचे पाहणाऱ्या महिलांनी दारू विक्रेत्यांच्या तक्रारी पोलिसांकडे केल्या. पण तक्रारींची दखलच घेतल्या जात नाही. पोलिसांची गाडी येतच नाही. उलट तक्रार झाल्यावर अवैध विक्रेत्यास जामीन कसा मिळेल, यासाठीच पोलीस खटाटोप करतात.
तशीच तत्परता तक्रारकर्त्यां महिलेचे नाव गुन्हेगार विक्रेत्यास कळविण्यासाठी दाखवली जाते. मग तो गुन्हेगार वेगळ्या नावाने महिलांवर खोटी तक्रार दाखल करतो. महिलांनी आमच्या घरात शिरून तोडफोड व नुकसान केल्याचे पोलिसांना सांगितले जाते. या तक्रारीची मात्र तत्परतेने दखल घेत पोलीस महिला कार्यकर्त्यांना भंडावून सोडतात. तिच्या कुटुंबीयांना धमकावले जाते. काही प्रसंगी खोटय़ा गुन्हय़ात अडकविले गेल्याचे जनवादीच्या जिल्हा सचिव दुर्गा काकडे सांगतात.
खरांगणा परिसरातील अवैध दारूविक्रीची बाब संघटनांनी वारंवार उचलली आहे. या ठाण्यात महिलांना असभ्य व अपमानजनक वागणूक मिळते. महिलाविषयक गुन्हय़ात कार्यवाही होत नाही, असेही संघटनेकडून ऐकायला मिळाले. यापूर्वी अवैध दारूविक्रीच्या गुन्हय़ात न्यायालयात दोषारोप सिद्ध होण्याची बाब पोलीस यंत्रणेने गांभीर्याने घेतली होती. काही गुन्हेगारांना शिक्षाही झाली. पण पुढे परत येरे माझ्या मागल्या सुरू झाले. आता महिला कार्यकर्त्यांच्या संरक्षणाचा मुद्दा उपस्थित झाला आहे. त्यामुळे हे पोलिसांपुढे नवेच आव्हान ठरले आहे.
पोलिसांचे पाठबळ हवे
पोलिसांचे समर्थन असल्याशिवाय दारूविक्री होऊच शकत नाही. त्यांना हे एकच काम नाही, हे मान्य, पण आम्ही आंदोलन करतो त्याला पाठबळ तर द्या. पण उलटच कारवाई होते. आता नावे दिली तर संबंधित ठाणेदारांवर कारवाई व्हावी. दारूविक्री होणाऱ्या गावच्या बीट जमादारास दोषी ठरविण्यात यावे. पोलीस पाटलांकडून अवैध दारू विक्रेत्यांची यादी मागवून कारवाई सुरू करावी. अवैध दारूविक्रीत वारंवार आरोपी ठरणाऱ्या विक्रेत्यांना हद्दपार करावे, असे आमचे म्हणणे आहे. महिला कार्यकर्त्यांना वेळेवर संरक्षण मिळाल्यास त्या हिमतीने कार्य करतील. पोलिसांच्या कामात हातभार लावणाऱ्या या महिला कार्यकर्त्यां पोलिसांना अडचण का वाटतात?
– प्रभाताई घंगारे, संघटनेच्या मार्गदर्शक
विश्वास ठेवा, कारवाई होईलच
ठोस तक्रार हवी, मोघम तक्रारीवर काय कारवाई करणार, महिला कार्यकर्त्यांचे मी स्वागतच करते. त्यांना अपेक्षित ते सहकार्य देण्याची तयारी आहे. पोलिसांकडून दखल घेतली जात नसल्याची भावना असल्यास त्या थेट माझ्या मोबाइलवर बोलू शकतात. स्थानिक पोलीस सहकार्य करत नसतील तर त्यांना मी माझे विशेष पथक मदतीस द्यायला तयार आहे. खोटय़ा तक्रारीवर त्वरित चौकशी होईल. आहे त्याच यंत्रणेद्वारे काम करायचे आहे. म्हणून महिला संघटनेने विश्वास ठेवावा, कारवाई होईलच.
Service Unavailable
The server is temporarily unable to service your request due to maintenance downtime or capacity problems. Please try again later.
Additionally, a 503 Service Unavailable error was encountered while trying to use an ErrorDocument to handle the request.