Menu

देश
किसान लाँग मार्च मुंबईच्या वेशीवर, गाण्यातून वेदनेचा हुंकार

nobanner

मजल-दरमजल करत शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा आता मुंबईच्या वेशीवर येऊन ठेपला आहे. ठाण्यातील मुक्कामानंतर हा मोर्चा उद्या, म्हणजे 12 तारखेला विधीमंडळावर धडकणार आहे. किसान सभेतर्फे हा मोर्चा काढण्यात आला.

ठाणे आणि मुंबईच्या वेशीवर असलेल्या आनंदनगर जकात नाक्याच्या मोकळ्या जागेवर शनिवारी रात्री या सर्व शेतकऱ्यांनी विश्राम घेतला. शेकडो किलोमीटर पायी चालून आलेले हे शेतकरी मात्र थकले नव्हते. रात्री काही शेतकऱ्यांनी झोप काढली, तर काही शेतकऱ्यांनी ढोलकी, पिपाणीच्या तालावर ठेका धरला.

पायात पैंजण बांधून या शेतकऱ्यांनी पारंपरिक नृत्य सादर केलं. तसंच क्रांतिगीतं, पारंपरिक गीतं गाऊन क्षणभर आपला सकाळपासून आलेला शीण घालवला.

वाहतुकीत बदल

किसान लाँग मार्चमुळे मुलुंड ते सोमय्या मैदान- चुनाभट्टीपर्यंत वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. सकाळी 9 ते रात्री 10 वाजेपर्यंत अवजड वाहनांना पूर्व द्रुतगती मार्गावर बंदी घालण्यात आली आहे.

याच कालावधीमध्ये मुंबईहून ठाण्याला जाणारी अवजड व माल वाहतूक करणारी वाहने वाशी खाडीपूल, ऐरोली, विटावा मार्गे ठाणे अशी वळवण्यात येणार आहेत.

शेतकऱ्यांची पदयात्रा सुरु असताना एक मार्ग छोट्या वाहनांच्या वाहतुकीसाठी मोकळा असेल. मात्र यावेळी या वाहनांना वेगमर्यादा ताशी 20 कि.मी. ठेवण्याचे बंधन असणार आहे.

शेतकरी पदयात्रेच्या दरम्यान वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असल्याने या मार्गाचा वापर करणे शक्यतो टाळावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे. त्याचबरोबर लालबहादूर शास्त्री मार्ग, सायन-पनवेल मार्ग, ठाणे-बेलापूर मार्ग याचा वापर करावा अशी सूचनाही वाहतूक पोलिसांनी दिली आहे.

शिवसेना-मनसेचा पाठिंबा

ठाण्याचे पालकमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी अजित नवलेंची भेट घेऊन त्यांना शिवसेनेचा पाठिंबा असल्याचं सांगितलं होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच आपल्याला पाठिंबा जाहीर केला आहे, तसा निरोप घेऊन मी आल्याचं शिंदे म्हणाले, असं नवलेंनी सांगितलं होतं.

शिवसेनेपाठोपाठ राज ठाकरे यांच्या मनसेनेही किसान सभेच्या लाँग मार्चला पाठिंबा दिला होता. स्वत: राज ठाकरे यांनी किसान सभेचे सचिव अजित नवले यांना फोन करुन, पाठिंबा जाहीर केला होता. मुंबईत आल्यानंतर या लाँग मार्चमध्ये मनसैनिकही सहभागी होतील, असं राज ठाकरे यांनी सांगितल्याचं अजित नवले म्हणाले होते. मनसे ठाणे आणि मुंबईत किसान लाँग मार्चचं जंगी स्वागत करणार आहे.

दुसरीकडे सर्व राजकीय पक्ष किसान सभेच्या लाँग मार्चला परवानगी देत आहेत, मात्र मुख्यमंत्र्यांनी अजून याची दखल घेतली नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी हट्टीपणा सोडून, शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्या, अशी मागणी अजित नवले यांनी केली.

धर्मा पाटील यांचा मुलगा मोर्चात

मंत्रालयात आत्महत्या केलेले शेतकरी धर्मा पाटील यांचा मुलगा नरेंद्रही गावातील 25 शेतकऱ्यांसह या मोर्चामध्ये सहभागी झाला आहे. मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत विधीमंडळाला घेराव घालण्याचा इशारा या शेतकऱ्यांनी दिला आहे. कर्जमाफी, शेतमालाला योग्य हमी भाव, शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणात सवलती अशा मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला आहे.

याआधी राज्यातल्या शेतकऱ्यांनी संप पुकारुन सरकारविरोधातला आपला रोष व्यक्त केला होता. त्यानंतर सरकारने 35 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी जाहीर केली होती. मात्र त्यातून कुणाच्या हाती फारसं काही न लागल्यामुळे शेतकरी आक्रमक झाले आहेत.

मागण्या काय आहेत?

-कसत असलेल्या वनजमिनी शेतकऱ्यांच्या नावावर कराव्यात

-शेतकऱ्यांना विनाअट कर्जमुक्ती द्या

-शेतीमालाला दीडपट हमीभाव द्या

-स्वामिनाथन आयोगाच्या रास्त भावाच्या शिफारशींची अमलबजावणी करा

-वन अधिकार कायद्याची संपूर्ण अंमलबजावणी करा

-पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी पूर्वेकडे वळवून राज्यातील शेती समृद्ध करा