Menu

खेल
चाचणीस अनुपस्थित राहण्याची सुशील, साक्षीला परवानगी

nobanner

आशियाई क्रीडा स्पर्धा

नवी दिल्ली : ऑलिम्पिक पदक विजेते सुशीलकुमार व साक्षी मलिक यांना आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी होणाऱ्या निवड चाचणीच्या वेळी अनुपस्थित राहण्यास भारतीय कुस्ती महासंघाने परवानगी दिली आहे.

सुशील, साक्षी, विनेश फोगट व बजरंग पुनिया यांनी आपल्याला या चाचणीतून वगळावे, अशी विनंती महासंघाकडे केली होती. ही विनंती मान्य करण्यात आली आहे, असे महासंघाच्या प्रवक्त्याने सांगितले. प्रवक्त्याने पुढे सांगितले, हे चारही खेळाडू आशियाई स्पर्धेतील संभाव्य पदक विजेते आहेत तसेच त्यांच्या वजन गटात भारतात अन्य तुल्यबळ खेळाडू नाही हे लक्षात घेऊनच या खेळाडूंना चाचणीपासून मुभा देण्यात आली आहे. तसेच त्यांना वैयक्तिक रीत्या सराव करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

सुशील सध्या छत्रसाल स्टेडियम येथे विनोदकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. विनेश व साक्षी या दोन्ही खेळाडू राष्ट्रीय शिबिरातच प्रशिक्षण घेत आहेत तर बजरंग हा जॉर्जियातील प्रशिक्षण शिबिरात सहभागी झाला आहे.

सोनपत येथे १० जून रोजी पुरुषांच्या ग्रीकोरोमन व फ्रीस्टाईल संघांकरिता चाचणी आयोजित करण्यात आली आहे. महिलांची चाचणी स्पर्धा लखनौ येथील भारतीय क्रीडा प्राधिकरणात १७ जून रोजी होणार आहे.

रिओ येथे २०१६ मध्ये घेण्यात आलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारतीय संघातील ७४ किलो गटात नरसिंग यादव याने पात्रता पूर्ण केली होती. मात्र त्या वेळी महासंघाने चाचणी न घेतल्यामुळे सुशीलकुमारने न्यायालयात धाव घेतली होती. आता मात्र सुशीलकुमारने चाचणीत सहभागी न होता संघात निवड करावी, अशी विनंती केली असल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत महासंघाच्या प्रवक्त्याने सांगितले, सुशीलच्या वजनी गटात त्याला पराभूत करील असा मल्ल सध्या नसल्यामुळेच त्याला चाचणीस अनुपस्थित राहण्यास परवानगी दिली आहे.