Menu

अपराध समाचार
दिलीपकुमार बंगला प्रकरणात बनावट कागदपत्रेच!

nobanner

विकासक समीर भोजवानी अडचणीत

दिग्गज अभिनेते दिलीपकुमार आणि सायरा बानो यांचे वास्तव्य असलेला वांद्रे येथील बंगला बळकाविण्याच्या हेतुने बनावट कागदपत्रे तयार केल्याचे आर्थिक गुन्हे विभागाच्या तपासात स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी दाखल गुन्ह्य़ात अटकपूर्व जामीन मिळाला असला तरी दुसऱ्या प्रकरणात अटकेत असलेले विकासक समीर भोजवानी अडचणीत येण्याची शक्यता असल्याचे आर्थिक गुन्हे विभागातील सूत्रांनी सांगितले. खटाव कुटुंबीयांच्या मालकीच्या ट्रस्टच्या मढ-अक्सा येथील मालमत्तेप्रकरणी दाखल गुन्ह्य़ात बनावट कागदपत्रे तयार केल्याप्रकरणात भोजवानी अटकेत आहेत. त्यांचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला आहे.

दिलीप कुमार राहत असलेला बंगला आपल्या मालकीचा असल्याचा दावा करीत भोजवानी यांनी तो रिक्त करण्यासाठी दबाव आणला होता. हा बंगलाही मूळ खटाव ट्रस्टशी संबंधित होता. परंतु या प्रकरणी आपल्याकडे नोंदणीकृत कागदपत्रे असल्याचा दावा भोजवानी यांनी केला होता. या प्रकरणी दिलीप कुमार आणि सायरा बानो यांनी आर्थिक गुन्हे विभागाकडे तक्रार दाखल केली होती. या प्रकरणात आर्थिक गुन्हे विभागाने गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्य़ात भोजवानी यांना अटकपूर्व जामीन मिळाला आहे.

खटाव ट्रस्टची अक्सा बीच येथील मालमत्ता बळकाविण्याचा प्रयत्न केला जात असल्याप्रकरणी दाखल तक्रारीवरून आर्थिक गुन्हे विभागाने गुन्हा दाखल करून भोजवानी यांच्याविरुद्ध अटकेची कारवाई केली होती. पाली हिल येथील तीन तर अक्सा बीच येथील दोन मालमत्ता भोजवानी यांनी बनावट कागदपत्रे तयार करून ती नोंदणीकृत करुन बळकावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.