Menu

देश
फेडरर पुन्हा अव्वलस्थानी

nobanner

माद्रिद मास्टर्समध्ये उपांत्यपूर्व फेरीत झालेल्या पराभवाचा फटका बसल्याने राफेल नदालने एटीपी जागतिक क्रमवारीतील त्याचे प्रथम स्थान गमावले असून महान टेनिसपटू रॉजर फेडररने पुन्हा अव्वल पटकावले आहे. मार्च महिन्यापासून फेडरर एकही सामना खेळलेला नसतानाही तो पुन्हा सर्वोच्च स्थानावर पोहोचला आहे.

दुसरीकडे माजी अव्वल टेनिसपटू नोव्हाक जोकोव्हिचची अजून सहा स्थानांनी घसरण होऊन तो १८व्या स्थानावर पोहोचला आहे. २००६च्या ऑक्टोबरनंतरची ही त्याची सगळ्यात खालची क्रमवारी आहे. माद्रिदचा विजेता अलेक्झांडर झ्वेरेव हा क्रमवारीत तृतीय क्रमांकावर कायम आहे. चौथ्या बल्गेरियाचा ग्रिगोर दिमित्रोव, पाचव्या स्थानी क्रोएशियाचा मरिन सिलीक आहे. तर भारतीय टेनिसपटू युकी भांब्रीची आठ स्थानांनी घसरण होऊन तो ९४व्या स्थानावर तर रामकुमार रामनाथन १२४व्या स्थानी आहे.

महिलांमध्ये सिमॉन अग्रस्थानी

महिलांमध्ये रोमानियाची सिमॉन हालेप अग्रस्थानावर असून त्यानंतर डेन्मार्कची कॅरोलीन व्होजनियाकी तर स्पेनची गर्बीन मुगुरुझा तृतीय स्थानावर आहे. तर माद्रिद स्पर्धेतील विजेती ठरलेली झेक रिपब्लिकची पेट्रा क्वितोव्हाला आठवे स्थान प्राप्त झाले आहे.