अपराध समाचार
मांजरीवरुन आईशी भांडण; मुंबईत तरुणाने मारली पुलावरुन उडी
- 195 Views
- May 04, 2018
- By admin
- in अपराध समाचार, समाचार
- Comments Off on मांजरीवरुन आईशी भांडण; मुंबईत तरुणाने मारली पुलावरुन उडी
- Edit
मांजरीवरुन आईशी झालेल्या भांडणानंतर २२ वर्षांच्या तरुणाने पुलावरुन उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना दक्षिण मुंबईत घडली. मौलविक सौंदलकर असे या तरुणाचे नाव असून या घटनेत त्याचा डावा पाय फ्रॅक्चर झाला आहे. त्याच्या डोक्यालाही गंभीर दुखापत झाली आहे. तर कुटुंबीयांनी मात्र ही आत्महत्या नसून बाईकचा अपघात झाल्याचा दावा केला आहे.
मंगळवारी संध्याकाळी मौलविकने सहा हजार रुपयांमध्ये एक मांजर विकत घेतली. मांजर घेऊन घरी पोहोचताच त्याचे आईशी भांडण झाले. मौलविकच्या आईने मांजरीला घरात ठेवण्यास विरोध दर्शवला होता. भांडणानंतर मौलविक घरातून निघून घेतला. यानंतर तो मरीन लाईन्स स्टेशनजवळ गेला आणि मेघदूत पुलावरुन खाली उडी मारली. पोलिसांनी हा आत्महत्येचा प्रयत्न असल्याचे सांगितले. पुलावर आल्यावर मौलविकने रस्त्याच्या कडेला दुचाकी पार्क केली आणि पुलावरुन खाली उडी मारली. उडी मारल्यावर तो केबल वायरवर अडकला. स्थानिकांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला असता तो रस्त्यावर पडला. यात त्याला गंभीर दुखापत झाली. सुदैवाने रस्त्यावर फारशी वर्दळ नसल्याने तो दुसऱ्या वाहनाखाली सापडला नाही, असे पोलिसांनी सांगितले. तर मौलविकच्या नातेवाईकांनी हा अपघात असल्याचा दावा केला. दुचाकीचा अपघात झाल्यानंतर तो पुलावरुन खाली पडला, असे त्याच्या नातेवाईकांनी सांगितले.
मौलविकने टोकाचे पाऊल उचलल्यानंतर त्याच्या आईने आता मांजरीला घरात ठेवून घेण्याची तयारी दर्शवली आहे. मौलविकवर सध्या रुग्णालातील अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. मौलविक शुद्धीवर आल्यावर त्याला मांजर दाखवीन आणि ती मांजर आता आपल्यासोबत राहणार असे त्याला सांगणार, असे त्याच्या आईने पाणावलेल्या डोळ्यांनी सांगितले. सध्या मौलविकने आणलेली मांजर रुग्णालयाबाहेरील बागेतच मुक्कामाला आहे. मौलविक शुद्धीवर येताच मांजरीला त्याच्यासमोर नेले जाईल, असे त्याच्या नातेवाईकांनी सांगितले.