खेल
शर्यत अजुन संपलेली नाही, प्ले-ऑफसाठी मुंबई इंडियन्सच्या आशा कायम!
राजस्थान रॉयल्सविरुद्ध सामन्यात मुंबई इंडियन्सला घरच्या मैदानावर पराभवाचा सामना करावा लागला. ७ गडी राखून राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सवर मात करुन प्ले-ऑफच्या शर्यतीत आपली दावेदारी प्रबळ केली. सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये पराभवाचा धक्का सहन कराव्या लागलेल्या मुंबई इंडियन्सच्या संघाला, प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी सर्व सामन्यांमध्ये विजय मिळवणं गरजेचं होतं. मात्र राजस्थानविरुद्धच्या पराभवानंतर मुंबईचा प्ले-ऑफचा मार्ग आता थोडा खडतर झालेला आहे. मात्र असं असलं तरीही मुंबई इंडियन्सच्या प्ले-ऑफच्या आशा अजुनही कायम आहेत.
सध्या १० गुणांसह सहाव्या स्थानावर असलेल्या मुंबई इंडियन्सला आपल्या उरलेल्या दोन्ही सामन्यांमध्ये मोठ्या फरकाने विजय मिळवणं गरजेचं आहे. असं झाल्यास मुंबईच्या खात्यात १४ गुण जमा होतील, मात्र याचसोबत त्यांना इतर सामन्यांच्या निकालावर अवलंबून रहावं लागणार आहे. राजस्थान विरुद्ध बंगळुरुच्या सामन्यात बंगळुरु आणि हैदराबाद विरुद्ध कोलकाता सामन्यात हैदराबादने विजय मिळवल्यास सरस धावगतीच्या आधारावर मुंबईचा संघ प्ले-ऑफच्या सामन्यांसाठी पात्र ठरु शकतो.
मुंबई इंडियन्ससोबत सध्या किंग्ज इलेव्हन पंजाब, कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हे संघ प्ले-ऑफच्या शर्यतीत आहेत. मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामन्यानंतर मुंबई इंडियन्सची गुणतालिकेतली परिस्थीती पुढीलप्रमाणे आहे…
मुंबई इंडियन्स – एकूण सामने १२, विजय ५, पराभव ७, धावगती ०.४०६, स्थान – ६
या सामन्यांच्या निकालावर अवलंबून असेल मुंबई इंडियन्सचं भवितव्य –
मुंबई इंडियन्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब – मुंबईला विजय आवश्यक
राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु – बंगळुरु जिंकण आवश्यक
सनराईजर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स – हैदराबाद जिंकण आवश्यक
दिल्ली डेअरडेविल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स – मुंबईला विजय आवश्यक
या सामन्यांचे निकाल मुंबई इंडियन्सला साजेसे लागल्यास गुणतालिकेचं चित्र काहीसं असं असेल –
हैदराबाद – २० किंवा २२ गुण
चेन्नई – १६/१८/२० गुण
किंग्ज इलेव्हन पंजाब – १४/१६/१८ गुण
मुंबई इंडियन्स – १४ गुण
कोलकाता नाईट रायडर्स – १२ किंवा १४ गुण
राजस्थान रॉयल्स – १२ किंवा १४ गुण
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु – १०/१२/१४ गुण
दिल्ली डेअरडेविल्स – ६ किंवा ८ गुण
(वरील गुणतालिका ही अंदाजावर तयार केलेली आहे)
त्यामुळे मुंबई इंडियन्सचा संघ आपले उर्वरित दोन सामने मोठ्या फरकाने जिंकला आणि इतर संघांचा निकाल मुंबईला साजेसा लागल्यास सरस धावगतीच्या आधारावर मुंबईचा संघ प्ले-ऑफसाठी अजुनही पात्र ठरु शकणार आहे.