Menu

खेल
आयपीएलमध्ये राशिद खानची गोलंदाजी माहित असल्याचा फायदा झाला – शिखर धवन

nobanner

भारत विरुद्ध अफगाणिस्तान कसोटी सामन्यातील पहिला दिवस गाजवला तो भारताचा सलामीवीर शिखर धवनने. प्रतिस्पर्धी गोलंदाजांचा समाचार घेत शिखरने शतकी खेळी केली. ९६ चेंडुंमध्ये १०७ धावांची खेळी करणाऱ्या धवनने सर्व अफगाणी गोलंदाजांच्या नाकीनऊ आणले. विशेष करुन अफगाणिस्तानचा युवा फिरकीपटू राशिद खानच्या गोलंदाजीवर शिखर धवनने चांगलाच हल्लोबल केला. आयपीएलमध्ये सरावादरम्यान राशिद खानच्या गोलंदाजीवर मी खेळलो असल्यामुळे मला त्याचा फायदा झाल्याचं धवनने पहिल्या दिवशी पत्रकार परिषदेत सांगितलं.

“गेली दोन वर्ष राशिद आणि मी सनराईजर्स हैदराबाद संघाकडून आयपीएल खेळतो आहे. नेट्समध्ये सरावादरम्यान मी राशिद खानच्या गोलंदाजीवर खेळलो आहे. त्यामुळे त्याचे चेंडू खेळपट्टीवर कसे येतील याची मला खात्री होती. या गोष्टीचा मला खरच फायदा झाला.” शिखर धवनने राशिद खानच्या गोलंदाजीबद्दल आपलं मत व्यक्त केलं.

अखेरच्या सत्रात अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी केलेला कमबॅक वाखणण्याजोगा आहे. या अनुभवातून अफगाणिस्तानचा संघ बरचं काही शिकेल. राशिद आणि माझ्या मैदानावरील द्वंद्वात मी बाजी मारली याचा मला आनंद आहे. मात्र राशिद एक चांगला गोलंदाज आहे…यापुढे तो अशीच चांगली कामगिरी करत राहिलं असा आत्मविश्वास शिखरने व्यक्त केला. पहिल्या दिवशी उपहाराआधी शतक झळकावणारा शिखर हा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. त्यामुळे दुसऱ्या दिवशी भारताचा संघ कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.