देश
उस्मानाबाद –लातूर- बीड विधानपरिषदेचा निकाल उद्या लागणार!
उस्मानाबाद-लातूर-बीड विधानपरिषद निवडणुकीच्या निकालाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. राज्यमंत्र्यांनी अपात्र ठरविलेल्या 10 नगरसेवकांची मते एकत्रित करून मोजणी करावी असे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. त्यामुळे उस्मानाबाद-लातूर-बीड विधानपरिषद निकालाचा मार्ग मोकळा झाला आहे.
उद्या सकाळी आठ वाजल्यापासून प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होईल, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये विधानपरिषद निकालाच्या अनुषंगाने 5 याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. औरंगाबाद खंडपीठाने यातील एक याचिका फेटाळत चार याचिका निकाली काढल्या. तसंच या विधानपरिषदेची मतमोजणी तत्काळ करण्याचे आदेश दिले आहेत.
याशिवाय राज्यमंत्र्यांनी अपात्र ठरविलेल्या 10 नगरसेवकांची मते एकत्रित करुन मोजणी करावी असे आदेशही खंडपीठाने दिले. त्यामुळे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या, धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यासाठी प्रतिष्ठेच्या ठरलेल्या निवडणुकीचा निकाल उद्या लागणार आहे.
औरंगाबाद खंडपीठात गणेश वाघमारे यांनी याचिका दाखल करून मतमोजणी करावी अशी मागणी केली. तर खंडपीठाच्या आदेशाप्रमाणे गोपनीयतेचा भंग होतो. त्यामुळे बीड जिल्ह्यातील 10 सदस्यांची मते ही वेगळी न करता सर्व मतांसोबतच मोजणी करावी अशी मागणी करणारी याचिका अमर नाईकवाडे यांनी दाखल केली होती.
या मतदारसंघासह राज्यातील सहा जागांसाठी 21 मे रोजी निवडणूक झाली. मात्र ही जागा वगळता सर्व जागांचे निकाल 24 मे रोजी जाहीरही झाले.
या मतदारसंघातील दहा सदस्यांना पालिकेत कचरा टाकल्याने निलंबित करण्यात आलं. मात्र त्यांना मतदानाचा हक्क द्यायचा की नाही, ते त्यांची मतं निकालात ग्राह्य धरायची की नाही असा सर्व वाद न्यायालयात गेला.
हे प्रकरण न्यायालयात गेल्याने, इथला निकाल अजून जाहीरच झालेला नाही. त्यामुळे या मतदारसंघात कोण बाजी मारतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. या मतदारसंघात भाजपचे सुरेश धस आणि राष्ट्रवादीने पाठिंबा दिलेले अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांच्यात लढत होत आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशाने स्थगित केलेली बीड-उस्मानाबाद-लातूर विधानपरिषद निवडणूक प्रक्रिया 11 जूनपर्यंत पूर्ण करा, अशा सूचना मुख्य निवडणूक आयोगाने दिल्या होत्या.