Menu

देश
चालत्या एसटीत तरुणाची हत्या, अश्लील फोटो व्हायरल प्रकरण

nobanner

पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात एक थरारक घटना घडली असून धावत्या एसटीमध्ये एका तरुणाची कोयत्याने वार करुन हत्या करण्यात आली आहे. या प्रकारामुळे परिसरात दहशत पसरली असून सगळीकडे हीच चर्चा सुरु आहे. बहिणीचे अश्लील फोटो व्हायरल केल्याप्रकरणी पोलिसांत तक्रार देणाऱ्या भावावर आरोपीकडून हा हल्ला करण्यात आल्याचे सुत्रांकडून कळते. आरोपींवर तत्काळ कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी नातेवाईक आणि नागरिकांनी खेड पोलिस ठाण्यात ठिय्या मांडला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, अजित भगवान कान्हूरकर असे आरोपीचे नाव असून तो हल्ला करुन फरार झाला आहे. दावडी (ता.खेड) या गावात मंगळवारी (दि.१२) सकाळी सव्वासातच्या सुमारास भोलेगाव-राजगुरुनगर या बसमध्ये प्रवाशांसमोर हा हल्ला करण्यात आला. ज्या बसमध्ये हा हल्ला करण्यात आला ती बस सध्या खेड पोलीस स्टेशनमध्ये उभी करण्यात आली आहे. अजितने ८ जून रोजी फिर्यादी मुलीचे अश्लील फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. याप्रकरणी आरोपी अजित कान्हूरकरविरोधात फिर्यादी मुलीने आपल्या भावाच्या मदतीने पोलिसांत तक्रार दाखल केली होती.

मात्र, पोलिसांनी या प्रकरणी हलगर्जीपणा करीत आरोपीवर तत्काळ कारवाई करण्याऐवजी त्याला मोकाट सोडले. त्यामुळेच आरोपी अजितने पीडित मुलीच्या भावावर कोयत्याने हल्ला करीत त्याची हत्या केली, असे सुत्रांकडून कळते. हल्लेखोर अजित कान्हूरकर हा तक्रारदार भावंडांचा सख्या अत्तेभाऊ असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.