खेल
जगभरात फुटबॉल फिव्हर, उद्यापासून रशियात किक
रशियात फुटबॉल फिफा विश्वचषक उद्या म्हणजेच 14 जूनपासून सुरू होत आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार उद्या-गुरुवारी सायंकाळी या विश्वचषकाचं मोठ्या दिमाखात उद्घाटन करण्यात येईल.
मॉस्कोतल्या ल्युझिनिकी स्टेडियमवर विश्वचषकाच्या उद्घाटन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. ब्रिटिश पॉपस्टार रॉबी विल्यम्सचा परफॉर्मन्स हे उद्घाटन सोहळ्याचं वैशिष्ट्य ठरेल.
32 संघांचा सहभाग
21 व्या फिफा विश्वचषकात यंदा 32 संघ सहभागी होत आहेत. हे संघ आठ ग्रुपमध्ये विभागले जातील. प्रत्येक गटात चार-चार संघ असतील. प्रत्येक ग्रुपमधील दोन संघ नॉकआऊट फेरीत प्रवेश करतील.
दरम्यान, 32 संघापैकी सर्वात श्रीमंत संघ स्वित्झर्ल्डंडचा आहे तर सर्वात गरीब सेनेगलचा आहे. लोकसंख्येनुसार या स्पर्धेत भाग घेणारा सर्वात मोठा देश ब्राझील आहे तर सर्वात लहान देश आईसलँड आहे.
रशिया आणि सौदी अरेबियाचा सलामी सामना
रशियाची नामवंत गायिका आयडा गारिफुलिनाच्या साथीनं रॉबी विल्यम्स परफॉर्म करणार आहे. ब्राझिलचा 1994 आणि 2002 सालच्या विश्वचषक विजेत्या संघाचा सदस्य रोनाल्डो उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहणार आहे. या उद्घाटन सोहळ्यानंतर रशिया आणि सौदी अरेबिया संघांमध्ये सलामीचा सामना होईल.
कडक सुरक्षा व्यवस्था
फिफा विश्वचषकाला अतिरेकी आणि हुल्लडबाजांकडून असलेला धोका लक्षात घेऊन रशियानं अतिशय कडक सुरक्षाव्यवस्था तैनात केली आहे. विश्वचषक सामन्यांच्या यजमान शहरांमध्ये आकाशातून होणाऱ्या हल्ल्यांना सामोरं जाण्याची तयारी रशियानं ठेवली आहे.
रशियाची राजधानी असलेल्या मॉस्कोत लढाऊ विमानांचा ताफा कोणत्याही क्षणी उड्डाणासाठी सज्ज ठेवण्यात आला आहे. गुरुवारचा उद्घाटन सोहळा आणि सलामीचा सामना यासाठी मॉस्कोत सुमारे तीस हजार सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत.
फुटबॉलच्या देशीविदेशी चाहत्यांची पार्श्वभूमी शोधून काढण्याची मोहीमही रशियानं व्यापक पातळीवर हाती घेतली आहे. परदेशी चाहत्यांना रशियात दाखल झाल्यावर पोलीस स्थानकामध्ये जाऊन आपली नोंदणी करावी लागणार आहे.