Menu

अपराध समाचार
धक्कादायक! नववधूकडून प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या; पसरणी घाटातील हत्या प्रकरणाला कलाटणी

nobanner

वाई-पांचगणी रस्त्यावर पसरणी घाटात शनिवारी पुण्यातील पर्यटकाची त्याच्या नववधूनेच आपल्या प्रियकराच्या मदतीने हत्या केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकारामुळे मोठी खळबळ उडाली असून पोलिसांना दोन्ही आरोपींना अटक केली आहे. इतर आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. पोलीस उपअधीक्षक अजित टिके यांनी ही माहिती दिली.

पोलिसांच्या माहितीनुसार, राजेश व कल्याणी बोबडे (रा. काळेवाडी, सांगवी, पुणे) आणि आनंद व दीक्षा कांबळे (रा. डीपी रोड, औंध, पुणे) हे मित्र मोटारीने शनिवारी पुण्याहून महाबळेश्वरला फिरायला निघाले होते. वाईहून महाबळेश्वरला जात असताना पसरणी घाटात दीक्षा कांबळे हीला प्रवासादरम्यान मळमळू लागल्याने ती आपल्या मोटारीतून बाहेर आली त्याचक्षणी पांचगणीच्या दिशेने आलेल्या दोन दुचाकीवरील चौघांनी दीक्षा यांचे दागिने हिसकावण्याचा प्रयत्न केला. याला आनंद कांबळे यांनी प्रतिकार केला, यावेळी झालेल्या मारहाणीत आनंदची हत्या झाली होती. वरकरणी ही केवळ एक सर्वसाधारण लुटीची घटना वाटत असली तरी ती नियोजित घटना असल्याचे पोलिसांच्या चौकशीत निष्पण्ण झाले आहे.

तपासादरम्यान, सुरवातीला पोलिसांनी आनंदची पत्नी दीक्षा हिला ताब्यात घेतले. तिच्याकडे सखोल चौकशी केल्यानंतर तिने प्रियकराच्या मदतीनेच आपल्या पतीची हत्या घडवून आणल्याची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी पुण्यात जाऊन दीक्षाचा प्रियकर निखिल मळेकर (वय २४, रा. चिखली, पुणे) याला ताब्यात घेतले. निखील व दीक्षाचे विवाहापूर्वीपासून प्रेमसंबध होते, त्यांना लग्न करायचे होते. परंतू, दीक्षाच्या घरच्यांचा याला विरोध होता. त्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी आनंद कांबळे याच्यासोबत २० मे रोजी तिचे लग्न लावून दिले. हा विवाह निखिलला मान्य नव्हता म्हणून त्याने आपली प्रेयसी दीक्षाच्या मदतीने आनंदच्या हत्येचा कट आखला. त्यासाठी त्याने पुण्यातील एका स्थानिक गुंडाला सुपारी देऊन त्याच्याकडून दीक्षाच्या मदतीने या हत्याकांडाचा कट रचला आणि फिरायला जात असताना ही हत्या घडवून आणली.

या प्रकरणी राजेश बोबडे याने पोलिसात फिर्याद दिली आहे. दोन दुचाकीवरुन आलेल्या चार प्रत्यक्ष हत्या करणाऱ्या आरोपींना पकडण्यासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत. प्रवासी, पर्यटक व स्थानिक नागरिकांची मदतीने वाई पोलिसांना हा गुन्हा उघडकीस आणण्यात यश आले.