देश
नरेंद्र मोदींना सत्तेबाहेर घालवणं हे एकच लक्ष्य – जयराम रमेश
पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुका एकाच मुद्यावर लढल्या जातील तो म्हणजे ‘नरेंद्र मोदी’ असं स्पष्ट व प्रांजळ मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी व्यक्त केलं आहे. एका वृत्तवाहिनाला दिलेल्या मुलाखतीत रमेश म्हणाले की 2014 मध्ये एकमेव मुद्दा होता तो म्हणजे काँग्रेस तर पुढील निवडणुकीतला मुद्दा असेल नरेंद्र मोदी. मोदींनी केलेला खोटेपणा उघड करण्याचं काम आम्हाला करायचं आहे असं ते म्हणाले.
राहूल गांधी अध्यक्ष झाल्यावर काँग्रेसमध्ये तरूणांना मोठ्या प्रमाणावर वाव मिळाल्याचे त्यांनी सांगितले. सचिवासह सर्व महत्त्वाच्या पदांवर तरूणांची नियुक्ती मोठ्या प्रमाणावर झाली असल्याचे ते म्हणाले. काँग्रेसने कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर दाखवलेल्या तत्परतेचा दाखला रमेश यांनी दिला. गोवा मणीपूरमध्ये काँग्रेस तोंडावर पडली होती व मधल्या मध्ये बहुमत नसूनही भाजपानं मोका साधला होता. मात्र कर्नाटकमध्ये काँग्रेस गाफील राहिली नाही आणि तिनं अचूक खेळी करत सत्ता स्थापन केल्याचा दाखला रमेश यांनी दिला. लहान पक्ष असूनही जनता दल सेक्युलरला मुख्यमंत्रीपद देत मोठं मन काँग्रेसने दाखवल्याचे त्यांनी म्हटले आहे.
भाजपाविरोधात सगळ्यांनी एकत्र येऊन सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करायचा हे धोरण असेल याची कल्पना एव्हाना आलीच आहे. रमेश यांनीही उत्तर प्रदेशातल्या गोरखपूर-फूलपूर व कैराना या ठिकाणी महाआघाडीची फळं मिळाल्याचा दाखला दिला आहे. यापुढेही झारखंड, महाराष्ट्र, तेलंगणा, मध्यप्रदेश, राजस्थान, पश्चिम बंगाल अशा सगळ्या ठिकाणी महाआघाडीचे प्रयत्न केले जातील असे रमेश यांनी सांगितले.
अर्थात बिहारमध्ये नितिश कुमार यांच्याबरोबर आघाडीची शक्यता नसल्याचे रमेश यांनी स्पष्ट केले. नितिश कुमार भरोश्याचे नेते नसल्याचे ते म्हणाले. भाजपाच्या विरोधात निवडणूक लढवून नंतर त्यांनी भाजपासोबत घरोबा केला याचा दाखला त्यांनी दिला. कुठल्याही परिस्थितीत महाआघाडी स्थापन करायची आणि नरेंद्र मोदींना सत्तेतून बाहेर काढायचे हे एकच आमचं लक्ष्य असल्याचं रमेश यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे काँग्रेस किती जागा लढवणार, मित्रपक्ष किती जागा लढवणार या गोष्टी महत्त्वाच्या नसल्याचं व या गोष्टी त्या त्या वेळी स्पष्ट होतील असं त्यांनी म्हटलं आहे.